महाराष्ट्रात रोज सात शेतकऱ्यांची आत्महत्या, 4 महिन्यांत 838 मृत्यू

मिंधे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेय की काय अशी परिस्थिती राज्यात आहे. अवकाळीचा फटका, नापिकी, कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी बँका व सावकारांचा दबाव यामुळे शेतकरी पिचला आहे. निराश शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरू आहे. गेल्या 48 तासांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले असून गेल्या चार महिन्यांत राज्यात 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. ‘राजा’चा बळी जातोय आणि मिंधे सरकार खुशाल आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने ‘लाडकी बहीण’ व अन्य घटकांसाठी योजना आणल्या मग शेतकरी ‘लाडका’ नाही का, असा सवालही केला जात आहे.

 विदर्भात गेल्या 48 तासांत यवतमाळमध्ये 2, चंद्रपूरमध्ये 2 आणि भंडाऱ्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. यवतमाळ जिह्यातील गांधीनगर येथील बन्सी पवार आणि गगनमाळ येथील दादाराव बोबडे या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. चंद्रपूर जिह्यातील चोरटी येथील भोजराज राऊत आणि रणमोजन गावात नीलकंठ प्रधान तर भंडारा जिह्यातील दाभेविरली येथील विनोद ढोरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

मिंधे सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा केली, परंतु वीज बिलाची थकबाकी माफ केली नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असे सांगितले, पण वारंवार आश्वासने देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून दिली जाणारी मदतही तुटपुंजी आहे. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा सरकारकडून मिळालेला नाही.

पूर्व आणि पश्चिम विदर्भातील परिस्थिती तर भीषण आहे. विदर्भात 30 जूनपर्यंत केवळ 45 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तेथील कापूस आणि सोयाबिनला भाव नाही. त्यानंतरही सरकारने तिथे दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना आत्मघाती पावले उचलावी लागत असल्याचा आरोप होत आहे.

या 838 आत्महत्यांपैकी केवळ 171 प्रकरणे वैध ठरवण्यात आली. त्यातही केवळ 104 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाच सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. 62 प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. इतर 605 प्रकरणांच्या अद्याप कागदपत्रांची पडताळणीच सुरू आहे.

गाजर नको, शेतकऱ्यांना कर्जमाफी करा – संजय राऊत

शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांचे गाजर नको तर कर्जमाफी करा, हमीभाव द्या अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आत्महत्येची आकडेवारी पाहिल्यास रोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

अमरावतीत रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावतीत रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मे महिन्यापर्यंत अमरावतीत तब्बल 154 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यवतमाळ जिल्हा आत्महत्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2024 पर्यंत तिथे 132 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या – तिवारी

केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा शेतकरी नेते किशोर तिवारी आणि डॉ. अजित नवले यांचा आरोप आहे. पुरेसे बँकिंग क्रेडिट नसल्यामुळे बरेच शेतकरी छोटय़ा वित्त कंपन्या किंवा सावकारांवर अवलंबून असतात. त्यांना कठोर वसुलीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत, असे तिवारी म्हणाले.

हमीभाव कायदा करा!

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतमालाला हमीभाव कायदा मंजूर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, कांद्याला प्रतीक्विंटल चार हजार रुपये हमीभाव द्या, अशी मागणी कमलाकर शिंदे यांनी केली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 1995 ते 2014 दरम्यान 2 लाख 96 हजार 438 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  डेटा दर्शविते की, 1995 ते 2014 दरम्यान 296,438 शेतकरी आत्महत्या करून मरण पावले

2014 ते 2022 या नऊ वर्षांमध्ये, ही संख्या 100,474 इतकी होती. 2022 मध्ये, भारतामध्ये शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 11,290 व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत, जे देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी 6.6 टक्के आहेत.

यापूर्वी, सरकारांनी वेगवेगळे आकडे नोंदवले होते, 2014 मध्ये 5,650 शेतकरी आत्महत्या ते 2004 मधील सर्वाधिक 18,241 शेतकरी आत्महत्यांपर्यंत. z 2005 ते 10 वर्षांच्या कालावधीत भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रति 1,00,000 लोकसंख्येमागे 1.4 आणि 1.8 च्या दरम्यान होते. तथापि, 2017 आणि 2018 मधील आकडेवारीनुसार दररोज सरासरी 10 आत्महत्या किंवा प्रतिवर्षी 5760आत्महत्या दिसून आल्या. z शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत राज्ये फेरफार करत असल्याचा आरोप आहे.

2024 मध्ये झालेल्या आत्महत्या

जानेवारी              235

फेब्रुवारी               208

मार्च             215

एप्रिल           180

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नोंदीनुसार राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्काधिक 235 शेतकरी आत्महत्यांची नोंद एकटय़ा जानेकारीत झाली आहे. फेब्रुकारीत 208, मार्चमध्ये 215 तर एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपकली. त्यातून दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब समोर आली आहे.

आकडेवारीत हेराफेरी

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर करताना आत्महत्या कमी दिसाव्यात यासाठी हेराफेरी केली जाते. काही अपघाती मृत्यू दाखविले जातात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या माहितीनुसार देशात 2014 ते 2022 या काळात 53 हजार 796 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2016 ते 2022 या काळात 35 हजार 463 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अपघाती मृत्यू दाखविण्यात आले आहेत, खरे तर या सर्वच शेतकरी आत्महत्या आहेत, असा आरोप किसान सभेचे कार्यकर्ते, चांदवड येथील शेतकरी कमलाकर शिंदे यांनी केला.