बीडीडीवासीयांची वीज कापल्यास आंदोलन अटळ! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा

वरळीतील बीडीडी चाळीतील सार्वजनिक वापराच्या जागेवर वीज, पाण्याचे पंप इत्यादी वापराच्या वीज बिलांची थकीत रक्कम भरण्याची जबाबदारी ही पीडब्ल्यूडीची आहे.  असे असताना ही थकीत रक्कम भरा नाहीतर वीज कापली जाईल, अशी धमकी बेस्टने बीडीडीवासीयांना दिली आहे. मात्र, हवे तर मंत्र्यांची वीज कापा, पण बीडीडीवासीयांची वीज कापली जाता कामा नये! अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

 बीडीडीतील सार्वजनिक वापराच्या जागेवरील वीज आणि पाणी पंपांच्या थकीत वीजबिलाबाबत बीडीडीवासीयांना बेस्टने नोटिसी पाठवल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पत्र लिहिले होते. थकीत वीजबिलाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून वीजबिल त्यांनीच भरले पाहिजे, असे स्षप्ट केले हेते. मात्र, त्यानंतरही बेस्टने बीडीडीवासीयांना नोटिसा पाठवल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया एक्सवर ते म्हणाले, सार्वजनिक जागांचे वीजबील तातडीने न भरल्यास 15 दिवसात वीज कापली जाईल’ अशी सूचनावजा धमकीची नोटीस ’बेस्ट’ कडून बीडीडी रहिवाश्यांना मिळाली आहे. खरे तर पॅसेज लाईट्स, पाण्याचे पंप इत्यादी सार्वजनिक सुविधांच्या वीजबिलाची जबाबदारी ’सार्वजनिक बांधकाम विभाग’ म्हणजेच पीडब्ल्यूडीकडे आहे व त्यांच्याकडून बील थकलेले आहे. असे असताना बीडीडी रहिवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे!

मिंधे-भाजप राजवटीचा मुंबईकरांवर इतका राग का?

’बेस्ट’ अडचणीत असताना त्याला आर्थिक सहाय्य मिळत नाहीये आणि त्याचवेळी शासनाचा एक विभाग बील भरत नाहीये! नुकसान मात्र सामान्य मुंबईकरांचं होतंय! मिंधे-भाजप राजवटीचा मुंबईकरांवर इतका राग का? बेस्टला अर्थसहाय्य नाही, वीजबील भरणं नाही, पंत्राटदार मित्रांसाठी मात्र सदैव उधळपट्टी सुरू आहे.  मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी 26 कोटी रुपये उडवल्याची बातमी येते, पण सामान्य मुंबईकरांचं वीजबील भरायला टाळाटाळ केली जाते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.