बिल्डर, कंत्राटदार मित्रासाठी ‘सीएम’कडून रेसकोर्सचा बळी, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर कोस्टल रोडच्या जागेसह एकूण 300 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या ठिकाणी तब्बल चार वर्षे खोदकाम आणि काँक्रीट-माती टाकून भूमिगत पार्किंग करण्याचा ‘मिंधे’ सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईकरांना थीम पार्क नको असताना कंत्राटदार ‘सीएम’ त्यांच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांसाठी रेसकोर्सचा बळी देत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’वर ‘मिंधे’ सरकारच्या डावाची पोलखोल केली आहे. कंत्राटदार ‘सीएम’ना मुंबईतल्या क्लब आणि मोकळय़ा जागांवर ताबा मिळवण्यासाठी तिथे चेअरमन आणि सदस्य म्हणून त्यांचीच माणसे घुसवायची असल्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईकरांच्या हक्काची जागा आपल्या बिल्डर-कंत्राटदार मित्राला देण्यामागे कारण काय?, भाजप-मिंधे सरकार मुंबईचा इतका द्वेष का करते? मुंबईची ही लूट कशासाठी सुरू आहे, असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे रेसकोर्सची जागा मिंधे सरकारच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांच्या घशात जाण्यापासून वाचली आहे. मात्र आता या ठिकाणी मिंधे-भाजप सरकार बांधकाम, काँक्रीटीकरण करणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

गद्दार व्यक्ती आश्वासने पाळेल का?

आजवर अमाप देणाऱ्या पक्षाच्याच पाठीत वार करून पळून गेलेल्या माणसावर मुंबईकर विश्वास ठेवतील का, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मिध्यांना लगावला आहे. मुळात गद्दार व्यक्ती आश्वासने पाळेल का? महाराष्ट्राचे नुकसान करणाऱ्या या गद्दारांवर कोणी भरवसा ठेवेल का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.