दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उद्यापासून राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. किसान सभा आणि समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करणार आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी याबाबत माहिती दिली.
राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फुर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने सुरु केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी, दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे.
राज्य सरकारने नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे आदि मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.