रेसकोर्सवरील हेरिटेज स्ट्रक्चरला धक्का नको; बांधकाम करू नका! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रचंड पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात द्यावी लागली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी गार्डन, ओपन स्पेस आणि इतर सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये आणि हेरिटेज स्ट्रक्चरला धक्का लावू नका, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी पालिका, सरकारला ठणकावले आहे.

रेसकोर्सची मोकळी जागा ‘मिंधे’ सरकारकडून कंत्राटदार मित्र-बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने अखेरी ही जागा पालिकेला देण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर आपली भूमिका जाहीर केली आहे. पालिकेला 120 एकर जागा मिळाली असली तरी या ग्राऊंडवर किंवा परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवाय या परिसरात असणाऱया हेरिटेज स्ट्रक्चरलाही धक्का लावू नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या फायद्यासाठी या ठिकाणी कोणतीही जादा मेंबरशिप वेलिंग्टन क्लबने देऊ नये, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

घोटाळेबाजांना शिक्षा करणार

दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण 211 एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 साली भाडेकरारावर देण्यात आली. हा भाडेकरार 2013 मध्ये संपुष्टात आला. मात्र यानंतर करार वाढवला नसल्याने ही मुदत संपल्यानंतर आता या जागेपैकी 120 एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

– मात्र यादरम्यानच्या कालावधीत ही जागा मिंधे-भाजप सरकारच्या काळात बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचे कारस्थान करण्यात आले. ही बाब लांच्छनास्पद असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. शिवाय आमचे सरकार आल्यावर याबाबतीत घोटाळा करणाऱयांवर कारवाई करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.