मिंधे सरकारच्या सामानाची आवराआवर; उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

नीट परीक्षेतील गैरव्यवहार, राज्यात वाढलेली गुन्हेगारी, हिट ऍण्ड रन प्रकरण आणि ड्रग्जच्या खुलेआम विक्रीमुळे धगधगणारे पुणे, मराठा-ओबीसींमध्ये पेटलेला संघर्ष, शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या मिंधे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच सामानाची आवराआवर सुरू केली आहे. कारण गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीने सरकारला आक्रमकपणे घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन शेवटचे अधिवेशन ठरेल याची कल्पना मिंधे सरकारला आली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता मिंधे सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे.

शेतकऱ्यांची नाराजी भोवणार

शेतकऱ्यांकडे केलेले दुर्लक्ष मिंधे सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगलेच भोवले. कापूस, सोयाबीन पिकाला न मिळालेला भाव, कांदा निर्यातबंदी, शेतकरी कर्जमाफी, दुधाचे दर, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, पाऊस लांबल्याने उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले संकट हे मुद्देही मिंधे सरकारला भोवणार आहेत.

27 जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या व आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे, तर 28 जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

घोटाळय़ांवरून घेराव, दुर्घटनांचे पडसाद

राज्यात झालेले घोटाळे आणि दुर्घटनांचे मुद्दे या अधिवेशनात गाजणार आहेत. तिप्पट दराने कीटकनाशकांची खरेदी करून कृषी आयुक्तालयात झालेल्या घोटाळय़ासह इतर अनेक घोटाळय़ांचा जाब सरकारला विचारला जाणार आहे. डोंबिवली एमआयडीसीत लागलेली आग, नागपूरमधील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोट आणि घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना अशा विविध दुर्घटनांचे पडसादही अधिवेशनात उमटणार आहेत.

कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक होणार

ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून मिंधे सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. नालासोपाऱ्यात भरदिवसा झालेली तरुणीची हत्या, पुण्यातील पोर्शे कारचे हिट ऍण्ड रन प्रकरण, आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले कारस्थान या घटनांवरून सरकार उघडे पडले आहे. त्यावरून विरोधक आक्रमक होऊन अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार आहेत.