कंगना रनौत यांची नजर मिंध्यांच्या सीएम सूटवर, महाराष्ट्र सदन भेट वादात

मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणणाऱया नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांची नजर महाराष्ट्र सदनातील मिंध्यांच्या सीएम सूटवर असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी महाराष्ट्र सदनाला भेट दिली. या भेटीत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूट प्रचंड आवडला. अधिवेशनादरम्यान आपल्याला तोच सूट मिळावा असा हट्टही त्यांनी धरला. थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनावर दावा केल्याने वाद निर्माण झाला. प्रकरण आपल्याच अंगावर शेकणार असे दिसताच महाराष्ट्र सदन प्रशासन भानावर आले आणि कंगना रनौत यांनी सदनातील खोल्यांची केवळ पाहणी केली असे सांगत प्रशासनाने सारवासारव केली.

मुख्यमंत्र्यांचा कक्ष हा राजशिष्टाचारानुसार इतर कुणालाही वापरायला देता येत नाही, असे अधिकारी वर्ग वारंवार सांगत आहे. परंतु, कंगना यांना हा सूट आवडल्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलवली. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या एका नेत्याला त्यांनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंगना यांनी वरून दबाव आणल्यामुळे महाराष्ट्र सदनातील अधिकारी वर्ग चांगलाच भांबावला. मात्र, खासदार संजय राऊत यांच्या ट्विटमुळे कंगना सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या आणि त्यांचा मुख्यमंत्र्यांचा सूट घेऊन तिथे मुक्काम ठोकण्याचा बेतच बारगळला.

प्रशासन काय म्हणाले?

कंगना रनौत यांनी मुख्यमंत्र्यांचा कक्ष मागितला नाही. त्यांनी इथल्या खोल्या पाहिल्या, मात्र त्यांना त्या पसंत पडल्या नाहीत, अशी सारवासारव महाराष्ट्र सदनचे राजशिष्टाचार सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी केली. कंगना रनौत यांनी इच्छा व्यक्त केली तर त्या महाराष्ट्र सदनात राहु शकतात, असेही स्मिता शेलार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी हा मुर्खपणा

महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी कंगना रनौत यांनी करणे हा मुर्खपणा असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. कंगना रनौत इतक्या मोठय़ा आहेत की त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवे. मोठय़ा सूटबाबात एक नियम आहे. नवीन खासदार जेव्हा दिल्लीत निवडून जातात, तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात, त्याच राज्याच्या सदनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत त्यांची तिथेच व्यवस्था केली जाते. कालच मी आमच्या खासदारांची चौकशी केली. ते महाराष्ट्र सदनात आहेत. त्यांना सिंगल रूम मिळाली आहे. कंगना रनौत नावाच्या श्रीमती आहेत, त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा विनोदच आहे. त्या हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना हिमाचल सदनमध्ये ठेवावे, असे संजय राऊत यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.