डीएलएसचे जनक डकवर्थ गेले

डकवर्थ-लुईस अर्थात डीएलएस नियमाचे जनक फ्रँक डकवर्थ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. डीएलएसचे दुसरे जनक टोनी लुईस यांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले.

इंग्लंडचे फ्रँक डकवर्थ व टोनी लुईस या दोघांनी मिळून 1997मध्ये डकवर्थ-लुईस नियम शोधून काढला होता. आयसीसीने 1 जानेवारी 1997 मध्ये प्रथमच इंग्लंड-झिम्बाब्वे लढतीत या नियमांचा वापर केला. त्यानंतर 1999च्या वर्ल्ड कपमध्ये हा नियम पूर्णतः लागू करण्यात आला. सुरुवातीला बीसीसीआयने डकवर्थ-लुईस नियमाला विरोध केला होता, मात्र 2006 पासून या नियमाला मान्यता दिली. डकवर्थ-लुईस नियमामध्ये क्विन्सलॅण्ड विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव स्टर्न यांच्याही शोधाचा समावेश करण्यात आला. आता वेगाने धावा जमविण्यालाही प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सुरुवातीला डीएल असे नाव असलेल्या या नियमाला नंतर डीएलएस (डकवर्थ-लुईस स्टर्न) नियम असे नाव देण्यात आले.