सगेसोयर्‍यांचा कायदा न केल्यास पुन्हा मुंबईला आंदोलन! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सरकारने मराठा समाजाशी दगाबाजी करण्याचा विचार स्वप्नातही आणू नये. ठरल्याप्रमाणे 13 जुलैपर्यंत सगेसोयर्‍यांचा कायदा अंमलात आणा, नाहीतर पुन्हा मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा समाज जोपर्यंत मागे फिरा म्हणणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा चौथा टप्पा स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे हे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांचे मंगळवारी आंतरवाली सराटीत आगमन झाले. यावेळी फुलांच्या वर्षावात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशावरून सरकारची सालटी काढली. ठरल्याप्रमाणे सरकारने शब्द पाळला नाही तर मराठा समाजाची बैठक घेऊन विधानसभेला 288 जागा लढवायच्या की पाडायच्या याचा निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. आठ दिवसांत या विषयाचा निकाल लावा असेही जरांगे म्हणाले.

भुजबळांचा टांगा पलटी करणार
राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांची जीभ सैल सुटली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. भुजबळांचा टांगा पलटी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. भुजबळांना शेरोशायरीशिवाय काही येत नसल्याचा टोलाही जरांगे यांनी लगावला.

मला एकटे पाडण्याचा प्रयत्न
मला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण समाजासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. आंतरवालीत कुणी सोबत असो वा नसो माझे आंदोलन सुरूच राहणार असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.