महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पण जून संपत आला तरी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. जून महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केलेला नाही. मुंबईत जूनमध्ये आतापर्यंत पावसाची 45-50 टक्के तूट आहे. मात्र, हवामान विभागाने मुंबईकरांसाठी गुड न्यूज दिली आहे. मुंबईत मंगळवारपासून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच यलो अलर्टही जारी केला आहे.
मुंबईत जूनमध्ये 550 मिमी पाऊस पडतो. पण यंदा 200 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे मुंबईत जूनमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मुंबईला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईला दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईसह, रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील काही दिवसांत केरळ आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस होणार असल्याने आम्ही मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती मुंबईचे हवामान विभागाचे संचालक सुनिल कांबळे यांनी दिली. तर पुढील 2-3 दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटचे महेश पलावट यांनी सांगितले.