ओबीसी निवडणुकीसाठी एकत्र आले नाहीत – प्रा. लक्ष्मण हाके

ओबीसी समाज हा निवडणूक लढवण्यासाठी एकत्र आला नाही, तो आपल्या हक्कासाठी एकत्र आला आहे, असा टोला प्रा. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे-पाटील यांना लगावला. लोकसभा निवडणुकीतही ओबीसी नेत्यांनी हेच तत्त्व पाळले, असेही प्रा. हाके म्हणाले.

ओबीसी हक्कांसाठी उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर शहरातील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. हाके यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.  ओबीसी समाज एकत्र आला की तो निवडणूक जिंकण्यासाठीच एकत्र आल्याचे बोलतात आणि तुम्ही एकत्र येता तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर ताबा मिळवण्यासाठी येता, निवडणुका जिंकण्यासाठी येता असे ते म्हणाले. तुम्ही एकीकडे दलितांनी मतदान केल्याचा दावा करता आणि त्यांचाच संरक्षक अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द व्हावा म्हणून राज्यभर मोर्चे काढता हा विरोधाभास नाही का, असा सवालही प्रा. हाके यांनी केला. आरक्षण, सामाजिक न्याय, संविधान यावर लोकप्रतिनिधींचे प्रबोधन होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

मनोज जरांगे यांची ईडी चौकशी करा, नवनाथ वाघमारे यांची मागणी

मनोज जरांगेपाटील यांचे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होते. मुख्यमंत्र्यांनीच या आंदोलनाच्या पाठीशी ताकद उभी केली होती. गद्दारीचा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाचा राजकीय वापर केल्याचा आरोप करतानाच मनोज जरांगे यांची ईडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी पैसा कोणत्या मार्गाने आला हे जगासमोर आले पाहिजे, असे ते म्हणाले. येत्या अधिवेशनात सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही याचा तपशीलवार खुलासा केला नाही तर पुन्हा उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आंदोलनास विरोध केला म्हणून डॉ. तारख यांना काळे फासले

आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केला म्हणून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. आंतरवालीतील उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदन डॉ. तारख यांच्या नेतृत्वात काही गावकऱयांनी दिले होते. याचाच निषेध म्हणून हे काळे फासण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्वागत करण्याचे निमित्त करून काही तरुण डॉ. तारख यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यानंतर मराठय़ांशी गद्दारी का केली, असा सवाल करत त्यांना काळे फासले.