मुख्यमंत्र्यांचा बेइमानी आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट जास्त; संजय राऊत यांचा आरोप

Pc - Abhilash Pawar

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचा बेइमानीचा, थैल्या, पेटय़ा आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्याच आधारे लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईसह काही जागांवर दरोडा टाकला, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक येथे रविवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी स्ट्राईक रेटबद्दल केलेल्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत मिंध्यांसह महायुतीला जनतेचा काैल मिळाला नाही, त्यांनी पैशांनी स्ट्राईक रेट विकत घेतला आणि जागा लुटल्या. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे हेलिकॉप्टरमधून 20 कोटी कसे उतरवले, अंगरक्षक त्या बॅगा कसे पेलवत होते, हे सगळ्या जगाने पाहिले. आतादेखील ते कशासाठी येऊन गेलेत, हेही सगळ्यांना माहीत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपने शंभरहून अधिक जागा ओरबाडल्या, पाचशे ते पंधराशेच्या फरकाने जिंकलेल्या जागांपैकी बहुतांश ठिकाणी दिल्लीच्या दबावातूनच निर्णय फिरवण्यात आले. धुळे येथे सात मशीनची मतमोजणी बाकी असतानाच भाजपचा उमेदवार लगेच विजयी घोषित करा, असा दबाव महाराष्ट्रातील भाजपचे सत्ताधारी, तसेच पेंद्रातील वरिष्ठ सत्ताधाऱयांनी पह्न करून जिल्हाधिकाऱयांवर टाकला. काँग्रेसच्या सतर्कतेमुळे परत व्यवस्थित मोजणी झाली आणि ती जागा काँग्रेसने जिंकली, असे त्यांनी सांगितले.

आमच्या सर्व्हेनुसार आमची काही लाख मतं नकली शिवसेनेला गेली. कारण खरी शिवसेना समजून लोकांनी धनुष्यबाणाला मतदान केलं. पेंद्राकडून शासकीय-प्रशासकीय पातळीवर सगळ्यात जास्त शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं, असेही ते म्हणाले. या वेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार अॅड. संदीप गुळवे, महानगरप्रमुख विलास शिंदे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राला शिक्षण आणि शिक्षकी पेशाची मोठी परंपरा आहे. मुख्यमंत्री जर शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावत असतील तर आपल्या परंपरेला मोठा तडा जाताना दिसतोय. या थरापर्यंत खाली पडू नका. शिक्षकांना या बाजारात उभे करू नका, असे संजय राऊत यांनी ठणकावले.