‘वन नेशन वन इलेक्शन’चा नारा देणारे एक साधी परीक्षा घेऊ शकत नाहीत! आदित्य ठाकरे यांचा केंद्र सरकारला टोला

नीट, नेट, सीईटी परीक्षांमधील गोंधळावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केंद्र सरकारवर हल्ला चढवला. ‘वन नेशन वन इलेक्शन’चा नारा देणारे सरकार एक साधी परीक्षा घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. भारतीय जनता पक्ष धर्म-जातीवर चर्चा करतो पण परीक्षेवर करत नाही अशी टीका करतानाच, देशातील तरुणांसाठी यावर चर्चा व्हायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

एनटीएच्या महासंचालकांना बदलून काहीही होणार नाही. मंत्रीच बदलायला हवा आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी देशभरात जातात. अचानक परीक्षा रद्द करता मग विद्यार्थ्यांचे खर्च झालेले पैसे कोण देणार?

वरळी येथील जांबोरी मैदानात आयोजित युवा चषक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नीट, सीईटीच्या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला. नीट परीक्षा घेणाऱया नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोधकुमार सिंह यांची पेंद्र सरकारने हकालपट्टी केली. त्यावर, अध्यक्ष बदलून काहीही होणार नाही. तर संबंधित मंत्री बदलायला हवेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पहिल्या मंत्र्यांनी आधी सांगितले की, काहीही गडबड नाही आणि नंतर परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षाच रद्द केली. या परीक्षेसाठी विद्यार्थी देशभरात वेगवेगळय़ा ठिकाणी जातात. त्याचे पैसे कोण देणार? जे नुकसान झाले त्याचे पैसे कोण देणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

पेपरमध्ये चुका करणाऱयांना निलंबित करा

सीईटी परीक्षेच्या पेपरमध्ये 54 चुका झाल्या. त्यावर गेल्या वर्षीही 40 चुका झाल्या होत्या अशी सारवासारव सीईटी सेलकडून करण्यात आली. अशा चुका करणाऱया लोकांना निलंबित करायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका हातात का देत नाहीत? उत्तर पत्रिका हातात दिल्या तर देशाला कोणता धोका निर्माण होणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

वरळीत राजकीय चिखल झालाय, पण कमळ फुलू देणार नाही

लोकसभा निवडणुकीनंतर मिंधे गट, मनसे यांची नजर वरळी विधानसभा मतदारसंघाकडे वळली आहे. त्याबाबत माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना यावेळी विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले की, चिखलात फुटबॉल खेळणे याची एक वेगळी मजा असते. वरळीत राजकीय चिखल झाला आहे. पण त्यात कमळ फुलू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वरळीतून निवडणूक लढवताना मी म्हणालो होतो की, वरळीला ए प्लस बनवेन आणि त्यानंतर सर्वजण वरळी पाहायला येतील. आता सगळीकडून लोपं वरळी पाहायला येताहेत. काही मोठय़ा लोकांनी इथे रोड शो करावा अशीही माझी विनंती आहे. कारण त्यांनी रोड शो केला की फायदा आम्हाला होतो, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.