वन नेशन वन इलेक्शनचा नारा देणाऱ्यांना एक परीक्षा घेता येत नाहीए, आदित्य ठाकरे यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या वरळी मतदारसंघातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या परीक्षांच्या गोंधळावरून केंद्रातील सरकारला फटकारले आहे. ”हे सरकार वन नेशन वन इलेक्शनचा नारा देते पण यांना साधी एक परीक्षा घेता येत नाहीए, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच सरकारने यावर चर्चा करायला हवी असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

”देशात सध्या नीट नेट, सीईटीच्या परिक्षांचा गोंधळ सुरू आहे. यावर चर्चा व्हायला हवी. भाजप फक्त धर्म जातीवर बोलतेय. पण परिक्षेवर चर्चा होतच नाहीए. देशातील तरुणांसाठी यावर चर्चा व्हायला हवी. आम्ही संसदेत हा मुद्दा मांडणार आहोत. कारण हा देशाच्या भविष्याचा मुद्दा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”कालच्या पत्रकारपरिषदेत सीईटीच्या अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणे सांगितले गेले की गेल्या वर्षी 40 चुका झाल्या होत्या या वर्षी 54 चुका झाल्या होत्या. अशा कशा चुका होतात. या चुका करणाऱ्या लोकांना निलंबीत करायला हवे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका हातात का देत नाहीत? उत्तर पत्रिका हातात दिल्या तर देशाला कोणता धोका निर्माण होणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

नीट परीक्षेच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ”अध्यक्ष बदलून काही होणार नाही. मंत्री बदलायला हवे. पहिल्या मंत्र्‍यांनी आधी सांगतिले काही गडबड नाही. आणि नंतर परिक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा रद्द केली. या परिक्षेसाठी विद्यार्थी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याचे पैसे कोण देणार? जे नुकसान झाले त्याचे पैसे कोण देणार? हे वन नेशन वन इलेक्शनचा नारा देतात आणि एक परीक्षा नाही घेऊ शकत, अशी टीका आदित्य ठाकरे याांनी केली.