नीट परीक्षेचा घोळ; एनटीएचे डीजी सुबोध कुमार यांची हकालपट्टी

नीट परीक्षेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज रात्री उशिरा नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची अखेर हकालपट्टी केली. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरोला हे भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे सीएमडी आहेत. 1 मे 2024 रोजी त्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी)चे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

नीट आणि नेट परीक्षेतील घोळ प्रकरणामुळे पेंद्रातील भाजप सरकारवर चहुबाजूने टीकेची झोड उठली. देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकार जागे झाले.

नीट व नेट परीक्षा घोळाची होणार सीबीआय चौकशी

नीट परीक्षा गोंधळाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील घोळ आणि पेपरफुटीच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. याला आम्ही प्राधान्य देऊ, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

मोदी राजवटीत शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त – राहुल गांधी

आता नीट पीजीसुद्धा स्थगित करण्यात आली आहे. मोदी यांच्या राजवटीत देशाची शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे हे उदाहरण आहे. भाजपच्या राजवटीत विद्यार्थ्यांना आपले करीअर बनवण्यासाठी शिक्षण नाही, तर आपले भविष्य वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागत आहे. दरवेळी चूपचाप तमाशा बघणाऱ्या मोदींनी शिक्षणमाफियांसमोर गुडघे टेकले आहेत. मोदी सरकार हे विद्यार्थ्यांच्या भविष्यांसाठी सर्वात मोठा धोका आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना वाचवावेच लागेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आओ करेंगे परीक्षा पर चर्चा’ असा टोला मोदी सरकारला या सर्व गोंधळावर लगावला आहे.

नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली

नीट, नेटच्या परीक्षा पेपर फुटल्याचा घोळ सुरू असतानाच आता रविवारी, 23 जूनला सकाळी 9 वाजता होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस जारी करून याची माहिती दिली आहे. परीक्षेला 11 तास शिल्लक असताना हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,  विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.