धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे आणि बेस्टची जमीन हडपल्यानंतर अदानीचा डोळा आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या घरांवर आहे. शिवशाहीची धारावी शेड कॉम्प्लेक्समधील 334 घरे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) संक्रमण शिबिरासाठी देण्यात येणार आहेत. सध्या ही घरे सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असली तरी भविष्यात या इमारतींच्या जागेचा पुनर्विकास अदानीमार्फतच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने 2011 ते 2013 या दरम्यान संक्रमण शिबिरासाठी धारावीमधील शेड कॉम्प्लेक्स भागात 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून सात मजल्यांच्या चार इमारती उभारल्या आल्या होत्या. या इमारतींमध्ये प्रत्येकी 225 चौरस फुटांची एकूण 334 घरे आहेत. स्थानिकांचा विरोध डावलून धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी मिंधे सरकारने आता अदानी समूहावर सोपवली आहे. धारावीचा पुनर्विकास करताना संक्रमण शिबिरासाठी लागणाऱ्या घरांची आवश्यकता पाहता राज्य सरकारच्या निर्देशानुसार शिवशाही प्रकल्पाने ही घरे आता डीआरपीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या घरांसाठी 40 हजार रुपये डिपॉझिट आणि दरमहा आठ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
घरांची डागडुजी करून द्या!
334 घरे अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेली असल्यामुळे या घरांची डागडुजी करून द्या, अशी मागणी डीआरपीने शिवशाहीकडे केली आहे. त्यानुसार अधिकारी लवकरच या घरांची पाहणी करणार आहेत.