माणमध्ये अजूनही 23 गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा

दुष्काळाने पिसलेल्या व तहानलेल्या माण तालुक्यातील जनतेला मृग नक्षत्राच्या पावसाने आधार दिल्याने तालुक्यातील बहुतांशी टँकर बंद झाले असले, तरीही अद्याप 12 टँकरद्वारे 23 गावे व 165 वाडय़ा-वस्त्यांवरील हजारो ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. काही ठिकाणी जादा पावसाने पेरण्या खोळंबल्या, तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे माणमध्ये यंदा पावसाने ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

माण तालुक्यात वळीवाच्या पावसाने चांगली सुरुवात केल्यानंतर सात जूनला मृग नक्षत्र लागल्यावर तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ओढे-नाले वाहिले. शिंगणापूर पुष्कर तलाव, आंधळी धरण व पिंगळी तलावात थोडय़ा प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील काही गावांतील चांगला पाऊस झाल्याने दुष्काळ पावसाने हटवला असल्याचे स्पष्ट चित्र आहे. पाऊस झालेल्या भागात वापसा आला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. तर, काही भागात पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडत चाललेल्या आहेत.

प्रशासन यंत्रणने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य निर्णय घ्यावेत. राणंद, मार्डी, डंगिरेवाडी, पिंप्री, पळशी, मोही, इंजबाव, करखेल, भालवडी, हिंगणी, वर-म्हसवड, हवालदार वाडी, संमूखेड, पर्यंती, वाकी, झाशी, भाटकी, रांजनी, शिवरी, पांगरी, परकंदी, वडगाव ही गावे व त्याखालील 165वाडय़ा-वस्त्यांवर अद्यापि टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासन यंत्रणेने या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. जिथे आवश्यक आहेत, तिथे टँकरची व्यवस्था सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.