गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह राज्यातील विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत मोसमी वारे संपूर्ण राज्य व्यापणार असून पुढील पाच दिवस राज्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात यंदा पावसाने नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजेच 9 जूनला हजेरी लावली होती. त्यानंतर गायब झालेल्या पावसाने आता पुन्हा जोर पकडायला सुरुवात केली. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गात रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत मोसमी पाऊस दाखल झाला असून येत्या काही तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात राज्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत आज जोरदार बरसणार
मुंबई आणि ठाण्याला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईत रविवारी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले. येत्या 25 आणि 26 जूनला ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.