BJP मध्ये मतभेद! केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुत्राच्या वक्तव्याने वाद

केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. वक्तव्यात ते वडिलांची स्तुती करत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपच्या प्रचंड विजयानंतर अख्खी दिल्ली माझ्या वडिलांसमोर नतमस्तक आहे, असे कार्तिकेय सिंह चौहान म्हणाले.

कार्तिकेय सिंह चौहान यांची शक्रवारी सिहोर जिल्ह्यातील बुधनी विधानसभा मतदारसंघात भेरुंडामध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कार्तिकेय सिंह चौहान यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ आता वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून शेअर केला जातोय.

नेमकं काय म्हणाले कार्तिकेय सिंह चौहान?

बुधनीच्या जनतेने अद्भुत संदेश देण्याचे काम केले. जगाने आपली मोठी परीक्षा घेतली. तुमच्यात, माझ्यात आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांच्यात मला काहीच फरक दिसत नाही. आपण सगळे एक आहोत. मी आताच दिल्लीहून परतलो. आपले नेते (शिवराज सिंह चौहान) मुख्यमंत्री असताना लोकप्रिय होते. मात्र, आता मुख्यमंत्री नसले तरी ते आणखी लोकप्रिय झाले आहेत. एवढ्या प्रचंड विजयानंतर अख्खी दिल्ली त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. संपूर्ण दिल्ली आज त्यांचा सन्मान करते, त्यांना ओळखते, असे कार्तिकेय सिंह चौहान म्हणाले.

कार्तिकेय सिंह यांच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी यावरून निशाणा साधला. शिवराज यांचे युवराज म्हणतात दिल्ली घाबरली आहे. हे शंभर टक्के खरं आहे. आता संपूर्ण देशही घाबरलेल्या हुकूमशहाला पाहतोय. ही भीती म्हणजे पक्षातील मतभेदाचा आवाज आहे. ही भीती मोठ्या नेत्याच्या बंडाची! आघाडी सरकारच्या व्यवस्थेची भीती! सरकार कोसळण्याची भीती! खुर्चीच्या खिळखिळ्या झालेल्या पायांची भीती! शिवराज सिंह यांच्या राज्यात कच्चे-बच्चे नाही कोण, याचा विचार टीम भाजपने करून नये! पण ही भीती चांगली आहे! अशी टीका काँग्रेस नेते पटवारी यांनी केली.