राज्यात महायुती सरकारने ऐन पावसाळ्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस भरती सुरू केली आहे. राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पण पोलीस भरतीच्या टायमिंगवर विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित करत महायुती सरकारला घेरले आहे. आता पोलीस भरतीला जनतेतून विरोध सुरू झाला आहे. पुण्यात आज पोलीस भरती विरोधात आंदोलन करण्यात आले.
पुण्यात पोलीस भरती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कोविड काळात दोन वर्षे पोलीस भरती झाली नाही. त्यामुळे 2022 मध्ये भरतीसाठी अर्ज केलेल्या विध्यार्थ्यांनी दोन वर्षे वय वाढून मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले.
काय आहेत मागण्या?
पोलीस भरती 2022-23 मधील रिक्त पदांची आहे. पण त्यासाठी मार्च 2024 पर्यंतचे वय पकडण्यात आले आहे. कोणत्या जीरनुसार ही नियमाची अट ठेवण्यात आली आहे. चुकीची वय गणना केल्याने पोलीस भरतीपासून राज्यातील सुमारे 2 लाख विद्यार्थी वंचित आहेत, असे आंदोलकांनी म्हटले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागण्यात करण्यात आल्या आहेत.
यासह एस.ई.बी.सी. च्या विद्यार्थ्यांना कागदपत्र काढण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना फॉर्म भरू द्यावा. कारण त्यापासून 1 लाख विद्यार्थी वंचित आहेत. तसेच पावसाळ्यामुळे मुलांच्या झालेल्या नुकसानामुळे भरती प्रक्रिया स्थगित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.