>> मेघना साने
नॉर्थ अमेरिकेत ‘इंडियन हेरिटेज ऑफ कल्चरल असोसिएशन ऑफ एन जे’ या संस्थेतर्फे गेली आठ वर्षे सातत्याने ‘नाट्यदर्पण’ हा नाटय़महोत्सव आयोजित केला जातो. भारतीय कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केला जाणारा हा बहुभाषिक लघुनाटिका उत्सव. नृत्य, नाटक, संगीत या माध्यमातून समाज जीवनातील समस्या अभिव्यक्त होऊ शकतात या उद्देशाने या उत्सवात कलाकृती सादर होतात. सामाजिक जाणिवांना मांडणाऱ्या या नाट्यमहोत्सवाला नॉर्थ अमेरिकेतील भारतीयांचा अमीट प्रतिसाद लाभतो.
नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसते. नाटकातील संवादात माणसांच्या स्वभावाचे, त्यांच्या कृतींचे, रितीरिवाजांचे आणि जाणिवांचे प्रतिबिंब पडलेले असते. संपूर्ण नाटय़कृतीतून तत्कालीन किंवा पूर्वकालीन समाजाबद्दल काहीतरी विचार मांडलेला असतो. जीवनाच्या एखाद्या तुकड्याचे दर्शन दिलेले असते. नाटक म्हणजे एक प्रकारे समाजाचा आरसा असतो. म्हणूनच अमेरिकेतील नाटय महोत्सवाच्या आयोजकांनी त्यांच्या नाटय़ महोत्सवाचे नाव दिले आहे ‘नाट्यदर्पण.’
नॉर्थ अमेरिकेत ‘इंडियन हेरिटेज ऑफ कल्चरल असोसिएशन ऑफ एन जे’ या संस्थेतर्फे गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित होत असलेल्या बहुभाषिक लघुनाटिका उत्सवाचे – ‘नाट्यदर्पण’चे प्रणेते आहेत. डॉ. अशोक चौधरी. हैदराबाद येथील I I C T तून ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पीएच.डी. करून ते अमेरिकेत न्यू जर्सीला गेले. तिथे फायझर, मर्कसारख्या फार्मा कंपन्यांमध्ये यशस्वी रसायन शास्त्रज्ञ व ज्येष्ठ व्यवस्थापक म्हणून सुमारे तीस वर्षे काम करीत आहेत. पण भारतात असल्यापासूनच असलेली कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भारतीय कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. न्यू जर्सीत भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात असल्याने तेथील वातावरण त्यांच्या या प्रयत्नांना पोषक होते. नृत्य, नाटक, संगीत या माध्यमातून समाज जीवनातील समस्या अभिव्यक्त होऊ शकतात असा एक विचार त्यांनी तेथील मित्रमंडळींमध्ये मांडला. 2013 साली त्यांनी ‘इंडियन हेरिटेज ऑफ कल्चरल असोसिएशन ऑफ एन जे’ (IHCA – NJ) या संस्थेची स्थापना केली. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समविचारी मंडळीही त्यांनी शोधली.
IHCA – NJ तर्फे गेली आठ वर्षे न्यू जर्सी येथे ‘नाटय़दर्पण’ हा लघुनाटिकांचा उत्सव साजरा होत असतो. डॉ. अशोक चौधरी यांच्या लक्षात आले की, अमेरिकेत मराठी बांधवांबरोबरच गुजराती, पंजाबी, तामीळ बांधवसुद्धा आहेत. तेही मूळचे भारतीयच आहेत. त्यांनाही आपल्या भाषेतून नाटके पाहायला आवडतील. ‘नाटय़दर्पण’मधे बहुभाषिक नाटके दाखवली जावी हा त्यांचा विचार संस्थेच्या कार्यकारिणीने उचलून धरला. आता त्या दिशेने तयारी सुरू झाली. संस्थेच्या सदस्यांनी अमेरिकेतील निरनिराळ्या प्रांतांतील लेखकांना, दिग्दर्शकांना ओळखीतून वा सोशल मीडियाच्या सहाय्याने निरोप पाठवून आपापल्या भाषेतील संहिता पाठविण्याचे आवाहन केले. इंग्रजी, मराठी, गुजराती, पंजाबी, कन्नड इत्यादी भाषेतील उत्तम नाटिका निवडण्यासाठी त्या त्या भाषेतील तज्ञ मंडळींशी संपर्क साधला. ही तज्ञ मंडळीही उपक्रमाचा भाग होण्यास आनंदाने तयार झाली. डॉ. अशोक चौधरी यांनी उत्सवाचा हेतू सर्वांना समजावून सांगितला, ‘केवळ नव्या जुन्या कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ही चळवळ नाही. तर या नाटकांतून सध्याच्या सामाजिक समस्या प्रतिबिंबित व्हाव्यात, त्यावर चर्चा व्हावी, निरनिराळ्या प्रांतांतील लोकांमध्ये मैत्रीचा पूल बांधला जावा हादेखील उद्देश आहे.’
तज्ञांनी संहितांची निवड केल्यावर संहिता सादर करणार असलेल्या नाटकांच्या टीमना बोलावले गेले. ‘नाटय़दर्पण’मधे संहिता आणि सादरीकरण, दोन्ही उत्कृष्ट असणे अपेक्षित होते. म्हणून तालमी पाहून नाटके निवडण्यासाठी परीक्षक नेमले गेले. या सर्व प्रक्रियेमुळे ‘नाटय़दर्पण’मधे सादर होत असलेल्या लघुनाटिकांतील आशय व अभिनय यांचा दर्जा उच्च राहतो. या नाटकांना सेटची गरज नसते. प्रायोगिक रंगभूमीप्रमाणे नुसत्या लेव्हल्सवर भागते. आजवर सादर झालेल्या नाटकांमधून महिला सबलीकरण, मानसिक आरोग्य, मानवी तस्करी, इमिग्रेशन आणि LGBTQ अशा काही सामाजिक समस्यांचे दर्शन प्रेक्षकांना झाले. नाटकाचा विषय लोकांना नीट समजावा म्हणून नाटक संपल्यावर व्यासपीठावर तज्ञांकडून चर्चाही केली जाते. अशा चर्चांमुळे नाटय़गृह सोडल्यावर नाटक विसरून न जाता प्रेक्षकांच्या मनात निरनिराळ्या सामाजिक समस्यांविषयी जागृती निर्माण होते.
या लघुनाटय महोत्सवातून गेल्या आठ वर्षांत सहाशेच्या वर कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, प्रकाशयोजनाकार, ध्वनिसंयोजक यांना संधी मिळाली. ‘नाटय़दर्पण‘चा प्रामाणिक उद्देश आणि कार्य पाहून IHCA – NJ ला मिडलसेक्स कौंटी आणि द कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, एन.वाय. यांचा आर्थिक पाठिंबा तर मिळालाच, पण आता हे सर्व मिळून गेली सात वर्षे हा उपक्रम करीत आहेत. NEA (नॅशनल एंडोमेंट ऑफ आर्टस्) या, कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने अमेरिकेन केंद्र सरकारने (Federal Govt.) स्थापन केलेल्या खात्याकडून IHCA-NJ ला प्रतिष्ठित व मानाचे असे भरघोस अनुदान 2023-24 मध्ये मिळाले.
या चळवळीने आता नॉर्थ अमेरिकेतील भारतीयांमध्ये चांगलेच मूळ धरले आहे. या उपक्रमाच्या सातत्यपूर्ण उच्च गुणवत्तेमुळे प्रेक्षागृह तुडुंब भरू लागले आहेत व 2022 आणि 2023 मध्ये वॉशिंग्टन डी.सी., बॉस्टन, नॉर्थ कॅरोलिना येथेही हा महोत्सव भरविण्याची आमंत्रणे मिळाली. त्यामुळे हा महोत्सव आता केवळ न्यू जर्सीपुरता मर्यादित न राहता अमेरिकेतील इतर प्रांतातील लोकांनाही पाहायला मिळतो. या सर्व उपक्रमामुळे कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्याही सामाजिक जाणिवा जाग्या झाल्या, ते अधिक परिपक्व होत गेले.
मुख्य धारा रंगभूमी ही प्रेक्षकानुसारी असते. स्वतला व्यक्त करण्यापेक्षा तिथे प्रेक्षकांना खूश करण्याला, रिझवण्याला प्राथमिकता असते. मात्र समांतर रंगभूमीवर प्रेक्षकांना काय पाहायला आवडेल यापेक्षा काय म्हणणे, दाखवणे, करणे हे कलावंतांना औचित्याचे, निकडीचे, आवश्यक वाटते ते महत्त्वाचे ठरते. आगळेवेगळे आशयविषय, प्रतीक प्रतिमा, अर्थनिर्णयाचे वेगळे स्तर हुडकणे, वेगवेगळ्या जीवनदृष्टीने जुन्या तपशिलांकडे पाहणे, अपरिचित वस्तुस्थिती पुढे आणणे येथपासून प्रयोगाच्या नव्या शक्यता धुंडाळणे यासाठी ‘नाटय़दर्पण’ हा योग्य मंच आहे.