>> उदय पिंगळे
जगभरात स्त्रियांसोबत भेदभाव होताना आर्थिक पातळीवर दिसणारा भेद त्यांना असहाय्य करणारा ठरतो. आजच्या काळात सुधारणावादी विचार ही संकल्पना मूळ धरत असताना तिचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखणे जास्त महत्त्वाचे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन 2011 पासून 23 जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी ‘जमीन आणि मालमत्तेचे अधिकार बळकट करण्यावर भर देऊन लैंगिक समानतेच्या प्राप्तीला गती देणे’ हे घोषवाक्य ठरवले असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. जगभरात स्त्रियांसोबत भेदभाव केला जातो. अनेक देशांतील लाखो विधवा, त्यांच्यावरील आश्रितांना हिंसाचार, अन्याय, आरोग्य आणि आर्थिक समस्यांशी सामना करावा लागतो. तो दूर करण्यासाठीची जागरूकता निर्माण व्हावी असा यामागील हेतू आहे. आपण ज्यांना प्रगत राष्ट्र समजतो ती राष्ट्रे यास अपवाद नाहीत. अपवाद वगळता सामाजिक रचनाच अशी आहे की, स्त्रियांच्या दिनक्रमातील बराचसा भाग हा घर, मुलं आणि जोडीदाराच्या काम, काळजीशी जोडला गेला आहे. स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याने त्यांच्या आयुष्यातील एकटेपणाचा काळही अधिक असतो. नैसर्गिक हक्क, कायदेशीर हक्क आणि सन्मान यापासून त्यांना वंचित ठेवले जाते. कोविड 19 नंतर जगभरात जोडीदाराचे निधन झालेल्या स्त्रियांची संख्या खूप वाढली असून ती 26 कोटींच्या आसपास आहे. त्यातील सर्वाधिक स्त्रिया हिंदुस्थानात आहेत. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील स्त्रियांसाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांनी आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे वेळीच बरे होणाऱया आजाराचे गंभीर आजारात कधी रूपांतर होते ते समजत नाही. निम्न आर्थिक स्थिती असलेल्यांसाठी ज्या योजना आहेत, त्या त्यांच्याकडे कशा पोहोचतील हे पाहणे, तर उच्च आर्थिक स्तर असलेल्याकडे आर्थिक समस्या कदाचित नसेल तरी त्यांची मानसिक स्थिती जपणं हे महत्त्वाचे आहे. याशिवाय मध्यम आर्थिक स्थिती असलेला अजून एक वर्ग, ज्यांना त्याच्या किंवा जोडीदाराच्या मालकाकडून पुरेसे पेन्शन आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध आहेत. या सर्वांशिवाय असा एक मोठा वर्ग आहे, ज्यांना इतर समस्यांबरोबर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून न राहता आपल्या मर्जीनुसार हवे तसे पैसे खर्च करता येणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असे ढोबळमानाने म्हणता येईल. ज्यांनी यावर कधीच फारसा विचार केलेला नसेल त्यांच्यासाठी एटीएममधून किंवा बँकेत जाऊन पैसे काढणं हे एक आव्हान ठरू शकतं. अशा स्त्रियांना या सगळ्यांवर मात करणं कठीण असलं तरी अशक्य नाही. यासाठी काही सोप्या युक्त्या –
> अंदाजपत्रक ठरवल्याने आपल्या हातात किती रक्कम येईल आणि कोणते खर्च आहेत त्याचा अंदाज येईल. त्यात कपात करून बचत करता येईल का? याचा अंदाज घेता येईल. जेथे उचित व्यवहार होतात तेथे वस्तूंची खरेदी करता येईल.
> आपली खर्च करण्याची पद्धत जाणून घेऊन त्याचा आढावा घेतल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येईल. आपण तंत्रस्नेही असाल तर विविध आप्सची मदत घेता येईल. रोजचा जमाखर्च लिहिणे ही एक चांगली सवय आहे. खर्चात भरमसाट वाढ होणाऱया शिक्षण आणि आरोग्य खर्चावरील उपाय शोधाता येतील. आपले व्यावसायिक कौशल्य वाढवून अर्थप्राप्ती करता येईल.
> आपली अलीकडील आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे निश्चित करावीत. यामध्ये कर्ज फेडणे, आपत्कालीन खर्चाची तरतूद करणे यांचा समावेश होऊ शकेल.
> अर्थसाक्षरता वाढवणे अत्यंत गरजेचे असून यासाठी अनेक सरकारी संकेतस्थळांवर लेखन, दृश्राव्य माहिती उपलब्ध आहे. हे ज्ञान आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल. उदा. आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर आरोग्यविषयक गरजेसाठी मेडिक्लेम असणे, स्थिर सुरक्षित पैसा नियमित मिळत राहावा यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना, तर महागाईवर मात करणारी कमी जोखीम असणारी म्युच्युअल फंड योजना असेल. समतोल साधता येईल हे समजेल. आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी ते समजू शकेल. महागाई म्हणजे नेमकं काय ते समजेल.
> आपल्या पैशांचे व्यवस्थापन करणे कठीण वाटत असल्यास तज्ञांची मदत घेता येईल. त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शनही मिळू शकते. गुंतवणूक म्हणून पारंपरिक योजनांशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, रिटस, इनव्हीट, गोल्ड एसजीबी, ईजीआर यांसारखे आधुनिक प्रकार, काही धाडसी गुंतवणूक प्रकार, त्यातील जोखीम आणि मिळणारा परतावा याबद्दलची माहिती मिळू शकेल.
> नियमित औषधे, आरोग्य तपासण्या कराव्या लागत असल्यास काही दुकाने औषधांच्या किमतीवर 20 टक्के सवलत देतात तेथे खरेदी करता येईल. नियमित तपासण्या काही ट्रस्टमार्फत कमी दरात केल्या जातात, तेथून करून घेता येतील. खर्च कमी करण्यासाठी जेनेरिक औषधे विकत घेता येतील का? ते तपासता येईल.
> गुंतवणुकीच्या व्यवस्थित नोंदी ठेवून शक्यतो वारसास नामनिर्देशित करता येईल. याशिवाय अन्य कोणास देण्याची इच्छा असेल तर मृत्युपत्र बनवून त्याची नोंदणी करता येईल.
> आपल्या व्यवहारातून करदेयता न वाढता कर बचत करून आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल ते पाहता येईल.
> एकटेपणा विसरण्याच्या नादात अधिकाधिक खर्च केला जातो. योग्य खर्च विचारपूर्वक केल्यासच सुस्थितीत राहता येईल. नाहीतर सर्व पैसे संपल्यावर कळेल.
> आर्थिक जागरूकता निर्माण करणारे गट समाज माध्यमात कार्यरत असून त्यांना जोडून घेतल्यास आपली विचार करण्याची पद्धत बदलू शकते.
> ‘आपल्यासाठी आपणच!’ याची जाणीव ठेवून पुरेसा व्यायाम, चिंतन, ध्यानधारणा केल्यास आर्थिक ताणतणाव तीव्रतेने जाणवणार नाहीत. सकारात्मक विचार करून आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवता येईल.
> आपल्या छोटय़ा आर्थिक प्रगतीबद्दल स्वतचे कौतुक करून आर्थिक ध्येयाकडे वाटचाल करता येईल.
अगदी सहज कुणालाही लागू पडतील अशा या युक्त्या. त्यासाठी हवी असलेली मदत अथवा मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या जीवनात निश्चित बदल घडतील आणि दीर्घकाळात आपला पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
[email protected]
(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)