फेरपरीक्षा नको घोटाळ्याची चौकशी करा! सीईटीचा गोंधळ सुटेपर्यंत प्रवेशांना स्थगिती द्या!! आदित्य ठाकरे यांची मागणी

इंजिनीयरिंग, मेडिकल आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीत घोटाळा झाल्याने आंदोलन सुरू आहे. त्यावर फेरपरीक्षा घेण्यापेक्षा या संपूर्ण घोटाळय़ाची सखोल चौकशी करा आणि हा गोंधळ दूर होईपर्यंत प्रवेशांना स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज केली. परीक्षेत 54 चुका असूनही आयुक्तांना हटवले का नाही? पैसा कमविण्यासाठी सीईटी परीक्षा घेतली आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. ‘सीईटी परीक्षा 24 बॅचेसमध्ये घेतली गेली. पेपर एकच होता, पण प्रश्न वेगळे होते. पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी एकूण 1425 ऑब्जेक्शन नोंदवली. ती नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार पंचवीस रुपये घेतले गेले. म्हणजे सीईटी सेलने किती पैसे कमवले. आता या परीक्षेत एकूण 54 चुका समोर आल्या आहेत. मग सीईटी सेलच्या आयुक्तांना अजून हटवले का नाही?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. पेपर सेट करणाऱयांचीच आधी परीक्षा घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

सीईटी सेलने पेपरमध्ये 54 चुका केल्या आहेत. उत्तरपत्रिकाही तीन दिवसांत गायब होत्या. आता गुणही येत नाहीत, पर्सेंटाईल येतात असे सांगतानाच, काही पेपर कठीण तर काही सोपे होते अशी सारवासारव सीईटी सेलने सुरू केली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सीईटी सेल विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका का देत नाही असा सवाल करतानाच, विद्यार्थ्यांचे गुण एकसारखे आणि पर्सेंटाईल वेगवेगळे आहेत, प्रत्येक बॅचमध्ये टॉपर कोण हेसुद्धा कळत नसल्याकडे आदित्य ठाकरे यांनी यावेळी माध्यमांचे लक्ष वेधले.

ग्रेसमार्क दिलेच नाहीत… सीईटी सेलकडून सारवासारव
सीईटी परीक्षेत पीसीबी आणि पीसीएम ग्रुपच्या निकालात कोणत्याही विद्यार्थ्याला चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह गुण देण्याची पध्दत नाही. त्यामुळे हा निकाल पर्सेंटाईल पध्दतीने घोषित करण्यात आलेला आहे. तसेच या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला ग्रेस मार्क देण्यात आलेले नाहीत अशी सारवासारव यावर सीईटी सेलकडून करण्यात आली. मात्र 30 प्रश्नपत्रिकांमध्ये झालेल्या 54 चुका, मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची प्रत ऑनलाईन देण्यात यावी, सीईटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी परीक्षा घ्यावी अशा आदित्य ठाकरे यांनी समोर आणलेल्या त्रुटींवर सीईटी सेलकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही, याकडे युवासेनेकडून लक्ष वेधण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे पैसे परत करा
फेरपरीक्षा घेण्याचा सीईटी सेलचा विचार आहे, पण फेरपरीक्षा घेऊ नका, ऑब्जेक्शन नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. पर्सेंटाईलची पद्धत बंद करून गुणांच्या आधारावर मेरिट जाहीर करा असेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या नोकरभरतीवरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी हल्लाबोल केला. पोलीस भरतीवर त्यांनी टीका केली. पावसात पोलीस भरती कशी करता, असे ते म्हणाले.