लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीचा दारूण पराभव केला आहे. यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही आघाडीतील मित्रपक्षांनी तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणूक ही सेमीफायनल होती. आता विधानसभा निवडणुकीच्या फायनलसाठी वातावरण तापू लागले आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेने राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. राज्यात ऑगस्टनंतर कधीही विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
घरीघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. याशिवाय मतदान केंद्राच्या समस्याही दूर केल्या जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहे. या राज्यांमध्ये लवकर निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. ऐनवेळी अनेक मतदारांची नावे गायब झाली होती. तर काहीजणांची नावे ही दूरच्या मतदार केंद्रांवर आढळून आली होती. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगान मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. आणि अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट 2024 ही आहे. त्यामुळे 20 ऑगस्टनंतर कधीही विधानसभा निवडणुकांची अधिसूचना जारी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चारही राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची चिन्हे आहेत.