चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटात बऱयाच ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. या भागात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबरअखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा-भेडशी ते राज्य हद्द रस्ता राज्य मार्ग 189 कि.मी. 155/00 ते 163/00मधील तिलारी घाट मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर 2024 अखेर बंद व सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत.
चंदगड पोलीस ठाणे हद्दीतून बेळगाव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरून येणारी वाहतूक राज्यमार्ग 189 या मार्गावर असणाऱया तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. हा घाट खूपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस धोकादायक असून, घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा टर्न बसत नाही. त्यामुळे घाटामध्ये अनेक मोठे अपघात झाले आहेत. घाटामध्ये अवजड वाहतुकीमुळे तीव्र वळणांवर वाहन अडकून राहते व वाहन काढण्यासाठी क्रेन घेऊन जाणेसुद्धा अवघड होते. मोठय़ा क्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास क्रेनचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बेळगाव, कर्नाटक येथून गुगल मॅपवर गोव्यास जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातून दाखवतो. त्यामुळे वाहनचालक या घाटातून प्रवास करतात. घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरून परराज्यातून येणाऱया अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहन तिलारी घाटातून घेऊन जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना व वाहने घाटामध्ये अडकून राहण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुचाकी व इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो.
पर्यायी अंबोली घाट, चोर्ला घाटातून करा प्रवास
n तिलारी घाटातून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग आहेत. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-अंबोली ते बांदा हा महामार्ग क्र. 548 एच या महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून, 30 जून 2024 अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. तसेच उत्तूर-आजरा-अंबोलीमार्गे सावंतवाडी ते गोवा अशी वाहतूकदेखील या मार्गावरून होऊ शकते. तरी पर्यायी महामार्गावरून अवजड वाहतूक वळविण्यास हरकत नाही. तिलारी घाटाच्या सुरुवातीस व शेवटी हा घाट अवजड वाहतुकीकरिता बंद करण्यात आल्याबाबत फलक लावावेत. तसेच अवजड वाहतूक तिलारी घाटामधून जाऊ नये, यासाठी घाटाच्या सुरुवातीस व शेवटी कमी उंचीचे हॉरिझाँटल बार लावण्यात यावेत, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.