नीट युजी समुपदेशनावर बंदी घालण्यास आज झालेल्या सुनावणीत सर्वेच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला. अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द करण्यात येईल असे न्यायालयाने नमुद केले. तसेच याप्रकरणी दाखल याचिकांवर एनटीए आणि केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. याआधी 11 जून रोजीही सर्वेच्च न्यायालयाने समुपदेशन रद्द करण्याबाबतचे अपील फेटाळले होते. 49 विद्यार्थी आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.
याचिकाकर्त्यांनी परीक्षेत 620 हून अधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासण्याची आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. तसेच पेपरफुटीच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. सर्वेच्च न्यायालयाने नीट युजी प्रकरणी राजस्थान, कोलकाता आणि मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांना एकत्र केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही मागणी केली होती.
विद्यार्थ्यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
नीट पेपर लीक आणि नेट परीक्षा रद्द केल्याप्रकरणी देशभरातील विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरासमोर जोरदार निदर्शने केली. एनडीए सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अक्षरशŠ बॅरीकेड्सवर चढून विद्यार्थ्यांनी पोलिसांनाही विरोध दर्शवला. पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.