उपांत्य फेरी निश्चितीची लढाई, जो जिंकेल त्याचा दावा होणार मजबूत

सुपर एटच्या पहिल्याच लढतीत खणखणीत विजय नोंदविणारा जगज्जेता इंग्लंड आणि कधीही वर्ल्ड कप न जिंकलेला दक्षिण आफ्रिका आमने-सामने येताहेत. जो जिंकले तो आपला उपांत्य फेरीचा दावा मजबूत करणार असल्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा उभय संघांमध्ये तुफानी फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांचे वैशिष्टय़ म्हणजे दक्षिण आफ्रिकेने साखळीत विजयाचा षटकार ठोकत सुपर एट गाठले, तर इंग्लंडचा संघ दोन विजयांसह नेट रनरेटच्या आधारे सुपर एटमध्ये पोहोचला. पण दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत इंग्लंडची फलंदाजी बळकट आहे तर दक्षिण आफ्रिकेचा मारा अधिक तिखट. दोन्ही संघांनी सलामीचे सामने जोरदार जिंकलेत. दक्षिण आफ्रिकेने अमेरिकाला हरवण्याची करामत केली, तर इंग्लंडने साखळीत चारही सामने जिंकणाऱया यजमान विंडीजचा विजयरथ रोखला. आता ते योगायोगाने सलग पाच सामने जिंकणाऱया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहेत. त्यांचाही विजयरथ रोखण्याचे आव्हान इंग्लंडने स्वीकारले आहे.

बुधवारी इंग्लंडने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळ दाखवताना विंडीजचा केलेला पराभव पाहून साऱयांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे उद्याच्या इंग्लिश फलंदाज विरुद्ध आफ्रिकन गोलंदाज अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना साखळीत काही करता आले नव्हते, मात्र बुधवारी फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टॉने केलेल्या झंझावातात विंडीजविरुद्धचा संघ उडून गेला. सॉल्टच्या बॅटीतून निघालेल्या नाबाद 87 धावा या इंग्लंडच्या फलंदाजाकडून ठोकलेले पहिलेवहिले अर्धशतक होते.

इंग्लंडच्या फलंदाजांना साखळीत फलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती, मात्र सुपर एटमध्ये पहिल्याच सामन्यात त्यांनी मिळालेल्या संधीला अक्षरशः चोपून काढलेय. इंग्लिश गोलंदाजीत फारशी चमक दिसली नसली तरी फलंदाजांनी केलेली करामत त्यांची ताकद दाखवायला पुरेशी आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डिकॉकचा फॉर्मही महत्त्वाचा आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजीइतकीच त्यांची फलंदाजीही प्रभावी आहे, पण त्यांच्या दिग्गजांना अद्याप अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. ही आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरू शकते.

इंग्लंड संधीचे सोने करणार

इंग्लंडला एक सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे सुपर एटमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला होता. त्यांच्यावर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले होते, पण ते त्या संकटातून सहीसलामत सुटले. त्यामुळे आता त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाहीय. विंडीजविरुद्ध विजयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असून दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत उपांत्य फेरीत आपले स्थान सर्वप्रथम निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या गटातून दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत धडक मारतील, पण इंग्लंडचा विजय त्यांचे स्थान निश्चित करू शकते. असे प्रयत्न आफ्रिकेकडूनही होणे स्वाभाविक आहे.