सीईटी सेलद्वारे नुकताच अभियांत्रिकी औषधशास्त्र शाखेच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात गुण आणि श्रेणीबाबत मोठा घोळ आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा आणि विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण होत नाही तोपर्यंत राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या सीईटी परीक्षेच्या निकालात मोठा घोळ झाला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे, त्यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. निकालानंतर मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत समान गुण मिळालेले असतानाही गुण आणि श्रेणी देण्यात चुका केल्या आहेत, वेगवेगळे पर्सेटाईल दाखवण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर ही परीक्षा वेगवेगळय़ा बॅचेसमध्ये घेऊन त्यांची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते ही बाबही आक्षेपार्ह असून त्याचीही तक्रार विद्यार्थी-पालकांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी. तोपर्यंत राज्य सीईटीची प्रवेश परीक्षा थांबवण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.