सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग हा भाजपचा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन सोहळा शीव येथील ष्णमुखानंद हॉलमध्ये बुधवारी दणक्यात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दार मिंधे गटाची सालटी काढली. ”भाजपकडून होत असलेल्या सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग हा भाजपचा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच

लोकसभा निवडणूकीच्या वेळी मिंधे गटाकडून केल्या जाणाऱ्या शहरी नक्षलवादाच्या टीकेला उत्तर देत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली. ”आम्हाला ज्या संस्थांनी, लोकांनी पाठिंबा दिला त्याला मिंधे शहरी नक्षलवाद म्हणतात. हुकुमशाही तोडा फोडा मोडा व लोकशाही वाचवा हा आमचा प्रचार तुम्हाला नक्षलवाद वाटतो का? हा आतंकवाद वाटतो? जर लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर हो मी आतंकवादी आहे. देशाचे संविधान वाचवा हे आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. पण तुमचे जे दिल्लीत बापजादे बसले आहेत. ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआय पाठवता. एक गद्दार ज्याने अमोल कीर्तिकरचा विजय ढापला तो जाहीरपणे म्हणाला की माझ्याकडे पर्याय नव्हता.दमदाट्य़ा करून तुरुंगाची भीती दाखून सरकार पाडता. पक्षात घेता. हा तुमचा नक्षलवाद नाही तर काय ? हा शासकीय नक्षलवाद आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, विरोधी पक्ष फोडायचे. त्यांची माणसं स्वत:च्या पक्षात घ्यायचे मंत्रीपदं द्याची. चांगली सरकारं पाडायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक असा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”जनतेने या विजयाचं श्रेय मला दिलं. पण मी शून्य आहे. या यशाचा मानकरी मी मानणार नाही. या यशाचे धनी तुम्ही आहात. शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले की आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठिवर कुठेही जा तुला मरण नाही. आत्मविश्वास आणि अहंकारात फरक असतो. अहंकार हा मोदींमध्ये आहे. त्याचा तडाखा भाजपला बसला आहे. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर यांनी माझ्याबद्दल वावड्या उठवल्या. उद्धव ठाकरे एनडीएत जाणार असं परवलं. ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जायचं? मातेसमान शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जायचं? तुम्ही तुमचं बघा ना. तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताय. त्यासाठी अशा वावड्या उठवाता स्वत:चं झाकून ठेवा. तुमची वर पासून खालपर्यंत कशी फाटलीय ते बघा. कशाला या नसत्या उचापत्या करायच्या आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

” आपल्यावर जो आरोप केला जातो की शिवसेनाला मराठी व हिंदू मतं मिळाली नाही, आम्हाला मुस्लीम मतं मिळाली. मला त्यांना सांगायचे आहे की शिवसेनेला सर्व देशभक्तांची मतं मिळाली आहेत. केवळ संविधान वाचविण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली आहेत. आम्ही हिंदुत्व सोडलं असा आरोप होत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलंय असा माझा आऱोप आहे. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, जितनराम मांझी हे काय हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे मी नरेंद्र मोदींना आव्हान देतोय की तुम्ही चंद्राबाबूंचा जाहीरनामा पूर्ण करणार असं जाहीरपणे सांगा. नितीश कुमारांनी मुसलमानांना दिलेली वचनं पूर्ण करणार की नाही ते जाहीरपणे सांगा. तुमच्यासारखी आमच्याकडे चोरी मारी नाही. शिवसेना ही समोरून वार करेल पाठून वार करणारी आपली औलाद नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

”मी आज मिंध्यांना पुन्हा एकदा आव्हान देतोय की जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून गावात फिरा. एका गोष्टीचा मला अभिमान आहे की यावेळेस आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज दुसऱ्या कुणाचा फोटो वापरला नाही. यापुढेही कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर अजिबात नाही. मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय की विधानसभेचा प्रचार आतापासून सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहे. आमचे नाव चोरायचे नाही, वडील चोरायचे नाही, धनुष्यबाण चोरायचे नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा मिंध्यांना दुसरी निशाणी द्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटा लावा आणि या समोर. माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही. षंड़ आहात तुम्ही. या निवडणूकीत आपले कोण मित्र कोण हे शत्रू कोण हे स्पष्ट झालंय. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला. काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून पाठिंबा दिला. ढोंग करून पाठिंबा दिला. नाटक करणं ही देखील कला आहे. ती मोदींना चांगली जमते. आम्हाला नाही जमत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”माझी इच्छा होती की महाराष्ट्रातली निवडणूक पाच टप्प्यात नाही तर दहा टप्प्यात व्हायला हवी होती. रोज यांची सालटी काढली असती. मी नम्र आहे. तुम्ही प्रेमाने वागा तर आम्ही प्रेमाने वागू. पण पाठीत वार कराल तरी आम्ही वाघ नखं काढू. आता ते सुधीर मुनगंटीवार ज्यांची चंद्रपूरमध्ये नखं उपटलीयत ते लंडनमध्ये वाघनखं आणायला चालले आहेत. कशाला छत्रपतींचा अपमान करता. भगव्याशी बेईमानी करणारी अवलाद तुमची. भगव्यात भेद केला तुम्ही. शिवरायांचा भगवा भगवाच असला पाहिजे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगव्यावर मशालीचे चिन्ह लावू नका, असे आवाहन देखील शिवसैनिकांना केले.

”भाजपने महाराष्ट्रात दोन नवीन प्रभारी नेमले आहेत. भुपेंद्र यादव आणि अश्विणी वैष्णव… काय यांचा इतिहास? मंत्री म्हणून ते नालायक ठरले. महाराष्ट्रात आता यांचा मोठा खालसा होणार आहे. जर तुम्ही देशाच्या मंत्र्‍यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम कोण करणार. जर असे मंत्री तुम्ही पक्षाच्या कामाला जुंपले तर रेल्वे अपघात होणार नाही तर काय? , असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी भाषणात उद्ध ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचीही फिरकी घेतली. ”ते पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजवले की बारा… असं म्हणतायत. महाराष्ट्राशी कुणाची नाळ जुळलेली नाही. कुठे काही झाल्यावर जबाबदारी घ्यायची ताकद नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही नैसर्गिक युती नाही असं देवेंद्रजी म्हणाले होते. देवेंद्रजी तुम्ही आता जे काही त्रांगड केलं आहे. तुमची जी चंद्राबाबू नितीश कुमार यांच्यासोबत झालेली युती आहे ती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? नितीश कुमार म्हणालेले की संघ मुक्त भारत पाहिजे, त्यांना आता तुम्ही बाजूला घेऊन बसले आहेत. मांझी बोललेले राम कृष्ण काल्पनिक आहेत. दुसरं कुणी बोलले असते तर भाजपने त्यांना चपला मारल्या असत्या आणि आता ओ मांझी रे करत बसले आहेत. ज्यांना विचारांचा पत्तानाही, हिंदुत्वाचा आधार नाही अशांना सोबत घेतलं आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालायात माझ्या वडिलांनी व आजोबांनी भऱपूर शिकवलंय. त्यांच्या मार्गावर मी हिंदुत्व पुढे घेऊन जातोय. तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही. आमचं हिंदुत्व तेजस्वी आणि सुधारणावादी आहे. गोमुत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे ठामपणे सांगतोय. शेंडी जाणव्याचं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. दहशतवाद्यांना बडवणारं हिंदुत्व पाहिजे. मोदींनी आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व का सोडलं ? देशाला सांगा. सगळ्यांना माहित पाहिजे. nation wants to know, पुछता है भारत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”विधानपरिषदेच्या निवडणूका आल्या आहेत. मुंबईच्या दोन्ही पदवीधर आणि नाशिकची शिक्षक मतदारसंघाची लढत आहोत. मला या सगळ्या जागा जिंकायच्या आहेत. आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबायचं नाही. त्याचबरोबरीने 11 विधानपरिषदेच्या जागांची घोषणा झाली आहे. आमदारांच्या मतांवर निवडून येणार आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती करायची आहे. किती अंत बघणार आहात. अपात्रतेचा निर्णय शिवसेना राष्ट्रवादीच्या बाबतीत खोळंबून ठेवलाय. त्यांच्या अपात्रतेबाबत टांगती तलवार असताना ही निवडणूक प्रक्रीया कशी सुरू केली. अपात्र गद्दार आमदार मतदान करूच कसे शकतात. न्याय मिळाला पाहिजे. न्यायालय जर विलंब लागत असेल. रुग्णात जीव असेल तोपर्यंत ऑक्सिजन द्या. नंतर धावत येऊन काय उपयोग? ही लढाई वैयक्तित नाही. ही लोकशाहीची संविधानाची लढाई आहे. एक लढाई जनतेच्या न्यायालयात जिंकलेलो आहेत. जनतेने जाग दाखवली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही? किती दिवस तारीख पे तारीख करायला काय सनी देओल बसलाय. किती काळ बघायचे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

”नड्डा आपल्याला नडायला निघालेले. फक्त भाजपा देशात शिल्लक राहिलं असं म्हणालेले नड्डाजी आता आता तुमचा नाडा संभाळा. या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेकदा जालेयत. शिवसेना त्यांना पुरुन उरलेली आहे. शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलेले की आत्मविश्लास आणि अहंकारातला फऱक लक्षात ठेव. आदित्य शाळेत होता. त्यावेळी आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं देता की जाता? मातोश्रीवर ठरवलं की पूर्व विदर्भापासून सुरुवात करायची. मी सांगितलं नागपूरचं मोठं मैदान बुक कर. सभेच्या आदल्या दिवशी मी कस्तुरचंद मैदान बघायला गेलो. त्यावेळी कोणतरी मला म्हणालं की हे मैदान थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय. दुसऱ्या दिवशी तिथे रिघ लागली. सभा प्रचंड झाली. कस्तुरचंद पार्क ओसंडून वाहत होतं. त्या मैदानात कुणी हिंमत करत नव्हतं सभा घेण्याची. एक शिवसेनाप्रमुखांनी, अटलजींनी व इंदिराजींनी घेतली होती. तेव्हा आदित्य लहान होता तो मला म्हणाला की बाबा तुमची सभा मोठी होणार तेव्हा मी त्याला सांगितलं की ही माझी सभा नाही तर तुझ्या आजोबांची सभा आहे. त्यानंतर हे जेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं ते म्हणाले उद्धव ती माझी सभा नाही तर तुझ्या आजोबांची सभा आहेत. त्यावेळी बाळासाहेबांनी मला एक सल्ला दिली की उद्धव एक लक्षात ठेव ज्यावेळी तु कोणीतरी आहेस हे तुझ्या डोक्यात जाईल त्या क्षणी तु संपलास. आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवर आहेत. बाळासाहेब म्हणाले. की मी साधा माणूस आहे का लोकं माझं का एवढे लोकं ऐकतात, कारण ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. तसंच मी सुद्धा शून्य आहे, बाकी तुम्ही सगळे आहात. तुम्ही शून्याच्या पुढे उभं राहायचं की शुन्याच्या मागे उभं राहायचं हे ठरवायचं आहे. तुमच्या उभे राहण्यावर शून्याची काय किंमत असेल ते ठरेल मी लढतो ते तुमच्या हिंमतीवर भरोश्यावर लढतो. मी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी लढतो. मी लढतो ते देशभक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतो. म्हणूनच ही लढाई आहे. आपले काही योद्धे पराभूत झाले. पण आपण जगाला दाखवून दिलंय की भाजप अजिंक्य नाही. मोदीही अजिंक्य नाही. त्यांचाही पराभूत होऊ शकतो. मोदींचे पाय देखील मातीचे आहेत. हे आपण सिंद्ध केलंय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपल्याला त्यांनी केलेली गद्दारी आठवते. इतकी वर्ष झाली तरी अजुनही त्यांच्या कपाळावरचा गद्दाराचा शिक्का पुसला गेलेला नाही. त्यांचा अजून पुसला गेलेला नाही तर यांचा कधी जाणारय़ इतिहासात यांची नोंद गद्दार म्हणून झाली आहे. आता तुम्ही ठरवा तुमची गद्दार म्हणून व्हायला पाहिजे की योद्धा म्हणून व्हायला पाहिजे. मी म्हणेन हार जीत होत असते. निवडणूक हरलो तरी उद्या जिंकेन पण जर हिंमत हरलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिंमत रहणार नाही. काही ठिकाणचा पराभव जिव्हारी लागलाय माझ्या. तिथल्या पराभवाचा वचपा मी विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.