आभाळमाया – अवकाशी आघात विवरं

>> वैश्विक 

पृथ्वीवरच्या निसर्गचक्रात आपण अनेक प्रकारचे अवकाळी ‘आघात’ पचवत असतो. कधी कुठे ढगफुटीने उडवलेला हाहाकार तर कुठे बेसुमार गारपिटीचा तडाखा. हे सारं पृथ्वीच्या वातावरणातून होतं. तो आकाशीचा प्रताप असतो. अवकाश त्यापेक्षा कितीतरी विराट. अवघ्या विश्वाला सामावणारं. त्यात अब्जावधी तारे, दीर्घिका, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू अशा अनेक गोष्टींची गर्दी. या ताऱयांच्या नि ग्रहांच्या जत्रेत एकटंदुकटं भरकटलेल्या कोणा लघुग्रहाचा, अशनीचा किंवा धूमकेतूचा मार्ग अचानक बदलला तर ते भरवेगाने एखाद्या ताऱ्यात तरी विलीन होतात किंवा कोणा ग्रहावर आदळतात.

ज्यांना ‘सन ग्रेझिंग’ धूमकेतू म्हणतात त्याविषयी वेगळय़ा लेखात समजून घेऊ. ते आपल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जाऊन त्यात सामावून जातात. असे नगण्य धूमकेतू अनेक असतात. तसेच ते इतर ताऱ्यांमध्येही विलीन होतच असतील. कारण आपल्या सूर्यमालेच्या सभोवती (गोलाकार) असलेल्या ‘ऊर्ट क्लाऊड’ या धूमकेतूंच्या उगमस्थानाप्रमाणे इतर ताऱ्यांभोवतीही कदाचित धूमकेतूंची अशी वसाहत असू शकते. त्यांना एक्स्ट्रा सोलर ‘ऊर्ट क्लाऊड’ म्हणतात. त्याबद्दलही कधीतरी जाणून घेऊ. कारण अफाट विश्वातली रहस्यंही कोटय़वधी आहेत. आपलं संशोधन आणि आकलन जसजसं वाढत जाईल तसतशा या गोष्टी आपल्याला ‘नव्याने’ समजतील इतपंच.

अवकाशातून पृथ्वीवर कोसळणाऱ्या धूमकेतूंचं आणि अशनी अथवा महापाषाणांचं प्रमाण पृथ्वीच्या जन्मकाळात म्हणजे सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी खूपच होतं. या गोष्टींचा मारा सातत्याने भूपृष्ठावर होत होता. हे आघात सोसूनच आजची रम्य धरित्री आकाराला आली आहे.

मग पृथ्वीच्या आरंभकाळापासूनची अशनी किंवा धूमकेतूंच्या आघातांची सर्व विवरं आज अस्तित्वात आहेत का?… तर नाही. याचं कारण म्हणजे काळाच्या ओघात पूर, वनश्री, बदलतं हवामान यामुळे असंख्य छोटी विवरं भरून गेली, सपाट झाली किंवा त्यांचा काही ठोस पुरावा उरला नसल्याने अशा ‘लाखो’ विवरांचा मागोवा घेणं शक्य नाही, पण शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जी ज्ञात आणि वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेली ‘आघात विवरं’ आहेत त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

अवकाशातून एका क्षणी प्रचंड आकाराचा अशनी विलक्षण वेगाने भूपृष्ठावर येऊन आदळला तर नेमकं काय घडतं ते जाणून घेण्यासाठी फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्हय़ातलं ‘लोणार’ गाव अशाच एका अशनी-आघात विवरासाठी प्रसिद्ध आहे. इतिहास काळात त्याची खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून प्रसिद्धी होतीच, परंतु एकोणिसाव्या शतकापासून या तळय़ाचा आकार पाहून हे आघात विवर असावं असं मत मांडलं जाऊ लागलं. अखेरीस 1972 ते 74 च्या काळात अमेरिकेतील ‘स्मिथसॉनियन इन्स्टिटय़ूट’ आणि आपली ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांनी एकत्रितपणे शोध घेऊन या तलावात खोदकाम केलं. त्यातून त्यांना इथल्या अग्निजन्य खडकातील ‘प्लॅजिओक्लेज फेल्डस्पार’ या घटकाचं ‘मॅस्केलनाइट’मध्ये रूपांतर झालेलं आढळलं. असे केवळ प्रचंड आघातानेच घडत असल्याने हे आघात-विवर असल्याचं सिद्ध झालं आणि जगातील अग्निजन्य खडकात झालेल्या एकूण केवळ चार आघात-विवरांमध्ये ‘लोणार’चं नाव जगाच्या निवड नकाशामध्ये आलं. बाकीची तीनही विवरं ब्राझीलमध्ये आहेत.

जगात सध्या ठाऊक असलेली म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने निश्चित केलेली 190 ते 200 अशनी-आघात विवरं आहेत. त्यामधलं आणखी एक प्रसिद्ध विवर म्हणजे अमेरिकेच्या (यूएस) ऑरिझोना राज्यातील ‘बॅरिंजर व्रेटर’ या ठिकाणी आमच्या खगोल मंडळाच्या अनेक सभासदांनी भेट दिली आहे. लोणारला मात्र आम्ही 1992 पासून अनेकदा गेलो. 1993 मध्ये विवर-सरोवराची माहिती देणारी फिल्म बनवली आणि लोणार संवर्धन-संरक्षणासाठी जागृती व्हावी म्हणून 2002 मध्ये ‘लोणार विवर परिषद’ ही आयोजित केली.

पृथ्वीवरचं सर्वात मोठं आघातजन्य विवर (व्रेटर) दक्षिण आफ्रिकेत जोहॅनिसबर्गजवळ आहे. त्याचं नाव रेडिफोर्ट विवर (स्पेलिंग ब्रेडिफोर्ट) त्याचा विस्तार 170 ते 300 किलोमीटर (मुंबई-पुणे अंतराहून अधिक) आहे. त्याचा मध्यभागी असलेला उंचवटा ‘रेडिफोर्ट डोम’ म्हणून ओळखला जातो. हे आघात-विवर 20 लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेलं आहे. सुमारे 10 ते 15 किलोमीटर व्यासाचा एक भयंकर अशनी सेकंदाला 15 ते 20 किलोमीटर वेगाने पृथ्वीवर आदळला. त्याने ‘घडवलेलं’ हे विवर सध्या तरी सर्वात मोठं मानलं जातं. आणखी संशोधनांती इतरत्र कुठलं सापडलं तर गोष्ट वेगळी.

अगदी अलीकडच्या काळात असा एखादा महाकाय अशनी पृथ्वीकडे झेपावला होता का? त्याचं उत्तर ‘होय’ असं आहे. त्याविषयी पुढच्या लेखात.

[email protected]