राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून मुंबईसह राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उमेदवारांची चाचणी घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रती माणुसकी दाखवावी, असा सल्ला चाचणी घेणाऱ्यांना दिला आहे.
”महाराष्ट्र पोलीस दलासाठीची कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरु होतेय. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. महाराष्ट्रातले युवक या भरतीकडे अपेक्षेने पाहत आहेत. परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि काही भागात अजूनही उन्हाळ्याचा फटका बसत असताना ही भरती होत असल्याने सावधानता बाळगायला हवी. भरतीत सहभागी होणाऱ्या युवक-युवतींसाठी पाण्याची, सावलीची, औषधांची सोय असायलाच हवी. वैद्यकीय यंत्रणा चोख असायला हवी. वातावरणाची तीव्रता वाढल्यास तत्काळ भरती प्रक्रिया स्थगीत करुन पुढची तारिख द्यायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या युवक-युवतींना जरी कठोर परिक्षणातून जावं लागणार असलं तरी त्यात माणूसकी असावी. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या तमाम मित्र-मैत्रणींना खूप खूप शुभेच्छा”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील पोलीस दलात रिक्त पदे आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत होता. त्यामुळे गृह विभागाने 17 हजार 471 पदे भरण्याचा निर्णय घेतला. 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी केली गेली. मुंबईसह राज्यात 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांची मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू होत आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱया ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.