दिल्ली विमानतळावर पसरला अंधार; ‘बत्ती गुल’ झाल्याने उड्डाणे रखडली, कामकाज ठप्प

नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि विमानतळावर अंधार पसरल्याने खळबळ उडाली. ग्रीड फेल झाल्यामुळे विमानतळावर साधारण दोन मिनीटे बत्ती गुल झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बॅकअप सुविधेमुळे तिकीट काउंटर आणि इतर सुविधा काही सेकंदातच सुरळीत करण्यात आले.

संपूर्ण विमानतळाची एसी यंत्रणा बॅकअपवर येण्यासाठी सुमारे पाच मिनिटे लागली, त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जीएमआरच्या मते आता सर्व काही सुरळीत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी दिल्लीच्या विमातळावर दोन दिवसांच्या पॉवर बॅकअपची सुविधा असते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी  दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास वीज गेली. त्यामुळे चेक इन, तिकीट आणि इतर सुविधांवर बराच काळ परिणाम झाला. यावेळी विविध गोष्टींना विलंब झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी उघडपणे सोशल मीडियावर पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली. या पोस्टमध्ये प्रवाशांनी लांबलचक रांगा, एअरलाईन स्टाफकडून अपडेट नसणे याबाबत चिंता व्यक्त केली. एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, दिल्ली विमानतळाचे T3 टर्मिनल वीजगुल झाल्याने गुदमरायला होत आहे. त्यांनी लिहिले की, कोणतेही काउंटर, डिजी यात्रा, काहीही काम करत नाही. हे आश्चर्यकारक आहे.  एका अन्य युजरने लिहिले की,  IGI विमानतळावर सुमारे 15 मिनिटे वीज गायब आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक युजर्सनी पॉवर फेल होण्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.