पारनेर नगरपंचायत हद्दीतील गट क्र. 3903, 3554/1, 3540/1 व 3544/2 मिळकत नंबर 2594/2596 या जमीनीवर भैरवी अपार्टमेंट अस्तित्वात नसतानाही नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नं 8 वर 35 शॉप व 25 फ्लॅटची बेकायदेशीर नोंद लावून बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून नगरपंचायत पारनेर प्रशासनाचा खोटा पुरावा सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय औटीसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पारनेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष समिर बारवकर यांना पत्र दिले आहे.
गुन्हा दाखल करण्याकामी छबन रघुनाथ औटी, राजेंद्र भाऊसाहेब पठारे व माधव मारूती गाजरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपंचायतीच्या प्राधिकृत कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.
पारनेर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी संबंधित मिळकतीची स्थळ पाहणी केली असता त्या मिळकतीवर भैरवी अपार्टमेंट इमारत अस्तित्वात नाही. मात्र नगरपंचायत मागणी रजिष्टर तथा नमुना नं 8 वर भैरवी अपार्टमेंट असा उल्लेख करून त्यावर एकूण 35 शॉप व 25 फ्लॅटची बेकायदेशीर नोंद आढळून आल्याचे संबंधीत तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. सदर नोंद दुय्यम निबंधक पारनेर यांचयाकडे दस्त 5717/2015 सुची क्र. 2 अर्जावरून नगरपंचायत दप्तरी नोंद केल्याचे सिद्ध होत असल्याचे नगरपंचात मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे.
प्रत्यक्षात भैरवी अपार्टमेंट व त्यावर 35 शॉप व 25 फ्लॅट नसतानाही नगरपंचायत प्रशासनाकडे खोटा अर्ज सादर करून नगरपंचायत प्रशासनाला खोटी माहीती सादर करून बनावट माहीतीच्या व कागदपत्रांच्या अधारे नोंदणी नं 8 रजिस्टरला खोटी नोंद लावून काहीतरी हेतू साध्य करण्याच्या इराद्याने जमीन मालक विजय सदाशिव औटी, संभाजी बबन मगर, विजया भागाजी नवले सर्व रा. पारनेर यांनी नोंदणी नं 8 रजिष्टरला खोटी नोंद लावून बनावट दस्त तयार करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, खासदार नीलेश लंके यांचे सहकारी अॅड. राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न तसेच इतर कलमांन्वये गुन्हे दाखल असून औटीसह इतर तिघे सध्या पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच पारनेर नगरपंचायतीनेही औटी याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने औटीच्या अडचणीत वाढ झाली आहे.