पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतही संकटात आली होती, पण दहा-दहा षटकांच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडने डकवर्थ–लुईस नियमानुसार नामिबियाचा 41 धावांनी पराभव करत आपला नेट रनरेट उंचावत सुपर एट प्रवेशाच्या आशा उंचावल्या होत्या आणि कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत इंग्लंडला सुपर एटमध्ये स्थान मिळवून दिले.
पावसाच्या व्यत्ययामुळे अडखळत झालेल्या सामन्यात हॅरी ब्रुकच्या 20 चेंडूंतील 47 धावांच्या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडने 10 षटकांत 5 बाद 122 अशी मजल मारली होती. पावसामुळे थांबून थांबून सुरू असलेल्या सामन्यात पंचांनी नामिबियाला विजयासाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार 126 धावांचे जबरदस्त आव्हान दिले होते. जे आव्हान नामिबियाला पेलवलेच नाही. नामिबियाचा संघ 10 षटकांत 3 बाद 84 धावांपर्यंतच पोहोचल्यामुळे इंग्लंडने डकवर्थ-लुईस नियमानुसार 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे इंग्लंडचा नेट रनरेट चांगलाच उंचावला. त्यामुळे स्कॉटलंडला इंग्लंडच्या नेट रनरेटशी स्पर्धा कठीण असल्यामुळे ऑस्ट्रेलियावर मात हाच पर्याय उरला होता. जो त्यांना मिळवता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या मदतीने इंग्लंडने शेवटच्या क्षणी सुपर एटमध्ये धडक मारली.