देशभक्तीचा धगधगता अंगार असलेला शिवसेना पक्ष आपला 58 वा वर्धापन दिन बुधवार, 19 जून रोजी साजरा करत असून यानिमित्त षण्मुखानंद सभागृहात दिमाखदार सोहळा होणार आहे. या सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक व आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणते भाष्य करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रखर राष्ट्राभिमानाचा जागर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुखांच्या ओजस्वी, तेजस्वी आणि ज्वलंत विचारांतून जन्म घेतलेला शिवसेना पक्ष आता 58 वर्षांचा झाला असून बुधवारी षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा उत्साहात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या सोहळय़ाला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या सर्व नेत्यांची प्रमुख उपस्थिती असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी व शिवसैनिक सोहळय़ाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 48 पैकी 30 जागा जिंकत भाजप-मिंधे-दादा गटाच्या महायुतीचा दारुण पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा जिंकण्याचे लक्ष्य असून महाविकास आघाडीने ही निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन सोहळय़ातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक सदस्य नोंदणीचा धडाका
स्थापना दिनाचे औचित्य साधून बुधवारी धूमधडाक्यात शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात होईल. 2024 ते 2026 असा नोंदणी मोहिमेचा कालावधी असेल.
नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार
शिवसेनेच्या 9 शिलेदारांनी लोकसभा निवडणुकीत विजय पताका फडकावली. या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्थळ – षण्मुखानंद सभागृह, किंग्ज सर्कल
वेळ – सायंकाळी 6 वाजता