मराठा समाजात भाजपबद्दल असंतोष; चंद्रकांत पाटील यांची कबुली

भाजपने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्या, मात्र त्यानंतरही मराठा समाजात भाजपबद्दल असंतोष आहे. हा असंतोष का आहे, यावर आमची सविस्तर चर्चाही झाल्याची कबुली भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेवटच्या मराठा माणसाबद्दल आम्ही दिलेल्या गोष्टींबद्दल माहिती पोहोचवण्यात, योजनांची मदत पोहोचवण्यात कमी पडलो, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागांवर घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपचा दारुण पराभव झाल्याने आता या पराभवाचे चिंतन भाजपकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना मराठा समाजात भाजपबद्दल असंतोष असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण आणि सवलती या गोष्टी वेगळय़ा केल्या. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सगळय़ा सवलती मराठा समाजाला दिल्या. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. 2017 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकवलं. सरकार बदलताच ते गेलं. पुन्हा एकनाथ शिंदेंच्या काळात मिळवलं. तरी मराठा समाजाचा रोष आहे? यासाठी आम्ही विचारमंथन केलं. त्यातून आणखी काही गोष्टी करण्याचे मुद्दे आले आहेत, असेही ते म्हणाले.