महाविकास आघाडीची मुंबई दुपारी पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरत यांच्यासह महाविकास आघाडीत मोठे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले, अशी चपकार शरद पवार यांनी यावेळी लगावली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात पंतप्रधानांच्या 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा जिथे झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान जेवढ्या जास्त ठिकाणी भेटीला येतील, तेवढं आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी अनुकूल वातावरण होईल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतो, अशी कोपरखळीही शरद पवार यांनी लगावली.
विरोधकांवर केंद्र सरकारकडून जी कारवाई होत आहे, ती म्हणजे पूर्णपणे सत्तेचा गैरवापर आहे. कारण नसताना काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापैकी काहीजणांना कोर्टाकडून जामीन मिळाला. पण अजूनही अनेक लोक तुरुंगात आहेत. याचा अर्थ हा सत्तेचा गैरवापर आहे. यामुळे या निवडणुकीत जनतेने जी काही भूमिका घेतली त्यातून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा होती. पण ते काही शहाणपणा शिकताना दिसत नाहीत. त्यामुळे आणखी तीन-चार महिन्यांनी लोकांसमोर जाण्याची संधी ज्यावेळी मिळेल त्यावेळी लोक त्याचा पूर्णपणे विचार करून ठोस निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.
कांदा उत्पादक शेतकरी नाराज होतेच. पण फक्त महाराष्ट्रातले शेतकरीच नाही तर देशातले सर्वच शेतकरी केंद्र सरकार आणि भाजप विरोधात होते. आजही त्यात बदल झाला आहे, असे चित्र दिसत नाही, असे शरद पवार पुढे म्हणाले.
मराठा आरक्षणसंबंधी राज्य सरकारने याआधी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना (मनोज जरांगे पाटली) काही शब्द आणि आश्वासनं दिली होती. नंतरच्या काळात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. राज्य सरकारने आंदोलकांच्या ज्या काही मागण्या मान्य केल्या आहेत किंवा आश्वासने दिली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती हाता बाहेर जाण्याची वेळ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा सावध इशाराही शरद पवार यांनी दिला.