मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे 89.67 टक्के काम पूर्ण झाले असून कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सागरी मार्गाला जोडण्यासाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर जोडण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. जुलैअखेर नंतर कोस्टल रोडच्या मरीन ड्राईव्हवरून वरळी-वांद्रे मार्गावरून प्रवास 12 मिनिटांत होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडसह सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, सखोल स्वच्छता अभियान, मुंबईचे सुशोभीकरण इत्यादी कामांचा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री आढावा घेतला.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन मार्गिका तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाणारी मार्गिका जुलैअखेर नंतर सुरू करण्यात येणार आहे.
दोन पिलरमधील अंतर 120 मीटर
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू समुद्रात एकमेकांना जेथे सांधले जातात तेथील दोन खांब्यांमधील अंतर 60 मीटरवरून 120 मीटरपर्यंत करण्यात आले आहे. कोळी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही.