RSS नेत्याच्या लेखावरून भाजप-अजित पवार गटात वाजलं, रंगलेल्या वाक् युद्धाची सगळीकडे चर्चा

भाजप आणि अजित पवार गटात चांगलंच वाक् युद्ध रंगल्याची चर्चा आहे. INDIA आघाडीनं राज्यात लोकसभेच्या अधिक जागा जिंकल्यानंतर भाजपला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑर्गनायझरमधील एका लेखावरून गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध झालं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवल्याबद्दल भाजपवर टीका करण्यात आली होती.

संख्येच्या दृष्टीने नजर टाकल्यास सर्वाधिक खासदार म्हणजे 80 खासदार उत्तर प्रदेशातून येतात. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिनिधी पाठवले जातात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत INDIA आघाडीने दमदार कामगिरी केली. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 17 जागा जिंकल्या, त्यापैकी अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, वरील परिस्थिती पाहता भाजपने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढायचे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण सुरू केले आहे.

एका लेखात आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याच्या भाजपच्या हालचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि हे पाऊल चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

‘हे चुकीचं पाऊल का उचललं गेलं? भाजप समर्थकांना दुखावलं गेलं कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विचारसरणीविरुद्ध वर्षानुवर्षे लढा दिला. एका फटक्यात भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली’, असं आरएसएसचे रतन शारदा यांनी लेखात लिहिलं आहे.

‘महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण आणि टाळता येण्याजोगे हेराफेरीचं एक प्रमुख उदाहरण आहे. अशा उशिरा येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांकडे दुर्लक्ष करण्यात आलं’, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, या लेखाला दोन्ही मित्रपक्षांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे लक्षण म्हणून पाहिलं जाऊ नये. ते म्हणाले, ‘साप्ताहिकातील एक लेख भाजपची भूमिका दर्शवत नाही. त्याचा अशा पद्धतीने अर्थ लावला जाऊ नये’.

मात्र, राष्ट्रवादीचे युवासेनेचे नेते सूरज चव्हाण म्हणाले की, भाजप जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचं श्रेय आरएसएसच्या मेहनतीला दिलं जातं, मात्र पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडलं जातं.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘आरएसएस ही आपल्या सर्वांसाठी वडिलांसारखी आहे. आरएसएसबद्दल भाष्य करण्याची गरज नाही. सूरज चव्हाण यांनी संघटनेवर भाष्य करण्याची घाई करायला नको होती. भाजपनं टिप्पणी केलेली नाही. एनडीएच्या बैठकीत अशा मुद्द्यांवर चर्चा झाली तर बरं होईल’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये राष्ट्रवादीने राज्यमंत्रिपद नाकारल्यानं दोन्ही पक्षांमधील मतभेदाची पहिली चिन्हं दिसून आली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनीही ऑफर नाकारली. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मागितले.

राष्ट्रवादीच्या बाजूने असा युक्तिवाद आहे की पटेल, माजी कॅबिनेट मंत्री म्हणून, कनिष्ठ मंत्रीपद धारण करण्यासाठी खूप वरिष्ठ आहेत. अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांचा पक्ष मंत्रिपदासाठी वाट पाहण्यास तयार आहे’.

पटेल यांनी म्हटले ‘मी पूर्वी कॅबिनेट मंत्री होतो (काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये आणि राज्यमंत्री (राज्यमंत्री) बनणे ही एक पदावनती आहे’.

भाजप आणि शिंदेगटासह महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत लढलेल्या चारपैकी फक्त एक जागा (रायगड) जिंकण्यात यश मिळविलं. बारामतीतही प्रतिष्ठेची लढाई हरली, जिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार आणि त्यांच्या चुलत बहिणी सुप्रिया सुळे यांनी पराभूत केलं.

इंडो-एशियन न्यूज सर्व्हिसनं अज्ञात सूत्रांता हवाला देत वृत्त दिले आहे की निकालानंतर भाजप अजित पवारांसोबत युती सुरू ठेवायची की नाही यावर विचार करत आहे.

‘पक्षाला एकट्यानं स्पष्ट बहुमत कसं मिळेल, हे जाणून घेण्यासाठी ही सर्वेक्षणे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय, शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपची कामगिरी कशी असेल हेही या सर्वेक्षणातून दिसून येईल. यावरून मूडही कळेल. अजित पवार गटासोबतची युती सुरू ठेवायची की नाही याबद्दलही स्पष्टता होईल’, असं भाजपच्या एका सूत्रानं आयएएनएसला सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत, यावेळी भाजपचा स्कोअर, 240, हा 2019 च्या 303 आणि 2014 मध्ये जिंकलेल्या 282 जागांपेक्षा खूपच कमी होता. दुसरीकडे, काँग्रेसनं 99 जागा जिंकून INDIA आघाडीच्या जोरावर चांगली मुसंडी मारली आहे. काँग्रेसनं याआधी स्वबळावर 2019 मध्ये 52 आणि 2014 मध्ये 44 जागा जिंकल्या होत्या. INDIA आघाडीनं 230 चा टप्पा ओलांडत तगडी टक्कर दिली आणि एक्झिट पोलमधील सर्व अंदाज धुडकावून लावले.