टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन परिसरात आज दुपारी थरारक पाठलाग करून धारदार शस्त्र्ााने एका तरुणाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. सुजल बाबासो कांबळे (वय 20, रा. वारे वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सुजल हा आज दुपारी साडेबाराच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरातील मंदिराजवळील कठडय़ावर मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी दोन ते तीन दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा युवकांनी हातात तलवार, एडका अशी धारदार शस्त्र घेऊन सुजलचा पाठलाग केला. यावेळी सुजल जिवाच्या आकांताने पाटीदार भवनच्या बाजूच्या रस्त्याने पळत सुटला. मात्र, त्याचा पाठलाग करून टोळक्याने त्याच्या पाठ, पोट आणि मानेवर वार केले. घटनास्थळी सुजल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सुजलच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, सायंकाळी उत्तरीय तपासणी करून सुजलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी सुजलच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केल्यामुळे तेथे जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.