सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खूनप्रकरणी चार महिन्यांपासून पसार असणाऱया सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी) यास कोल्हापूर जिह्यातील कागल येथे सापळा रचून अटक केली. ही कारवाई सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
वास्तविक या प्रकरणाचा तपास कुरुंदवाड पोलिसांकडे असला तरी पसार असलेले संशयित सांगलीतील असल्याने यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगलीचे सहकार्य घेण्याचे निर्देश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले होते.
सांगलीतील माहिती-अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांचा मृतदेह 7 जानेवारी रोजी कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेतालगत चारचाकीत आढळून आला. त्यांच्यावर धारदार शस्त्र्ााने वार करण्यात आले होते. याबाबतचा गुन्हा कुरुंदवाड पोलिसांत दाखल केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित नितेश दिलीप वराळे (वय 30), सूरज प्रकाश जाधव (वय 20, दोघे, रा. सिद्धार्थनगर, सांगली) आणि तुषार महेश भिसे (वय 20, आकाशवाणी केंद्राजवळ सांगली) यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयितांनी गुंड सिद्धार्थ चिपरीकर आणि शाहरुख शेख (दोघे रा. सांगलवाडी) यांचा सहभाग या खून प्रकरणात असल्याचे सांगितले.
दरम्यान, बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दीपक गायकवाड यांना पसार असलेला सिद्धार्थ चिपरीकर हा कागलमध्ये असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या निर्देशानुसार कागल येथे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह बिरोबा नरळे यांनी सापळा रचून अटक केली.