पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांना केवळ चमत्कारच वाचवू शकतो तर जगज्जेत्या इंग्लंडचे भवितव्य पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या हाती आहे. स्पर्धेत इंग्लंडला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. मात्र त्यांच्या पुढील दोन्ही लढती ओमान आणि नामिबिया या दुबळ्या संघांशी होणार आहेत. या दोन्ही संघांविरुद्ध मोठे विजय मिळवूनच ते आपले सुपर-एटचे आव्हान जिवंत ठेवू शकतात, पण ते सुपर-एटमध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्यावर ऑस्ट्रेलियाची कृपा असावी लागेल.
तीन सामन्यांत पाच गुणांसह दुसऱया क्रमांकावर असलेला स्कॉटलंड आपला चौथा आणि अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 जूनला खेळणार आहे. त्याआधी इंग्लंड आपले दोन्ही सामने खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांत पावसाची मेहेरबानी झाली तर इंग्लंड मोठे विजय मिळवेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या सामन्यात महाविजय मिळवत इंग्लंडला स्कॉटलंडपेक्षा आपला नेट रनरेट वर घेऊन जाण्याची नामी संधी आहे. या दोन्ही विजयामुळे इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचे गुण 5-5 सारखे होतील. त्यामुळे 16 जूनला होणाऱया ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड लढतीकडे सार्यांचे लक्ष लागलेले असेल.
या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा विजय अपेक्षित मानला जात आहे. कारण हा सामना विंडीजच्या ग्रॉस आयलेट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात स्कॉटलंड हरला तरी आपला नेट रनरेट इंग्लंडपेक्षा वरचढ करून सुपर-एट गाठू शकतो. स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला हरवले तर इंग्लंड आपोआपच स्पर्धेबाहेर फेकला जाईल. त्यामुळे स्कॉटलंडला दुसऱया डावात फलंदाजी आली तर त्यांच्यासमोर इंग्लंडपेक्षा नेट रनरेट चांगला करण्याची संधी असेल. त्यावेळी स्कॉटलंडला रोखायचे की इंग्लंडचा रनरेट गाठू द्यायचे, हे सर्वस्वी ऑस्ट्रेलियाच्या हाती असेल. या लढतीत ऑस्ट्रेलियाला विजयासह इंग्लंडला बाद करण्याचीही संधी लाभलेली असेल. त्यामुळे ते ‘सांप भी मरेगा और लाठी भी नही टुटेगी’ असा खेळ करू शकतात.