पुणे कल्याणीनगरमध्ये घडलेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील वाहनचालक आरोपीला वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने रक्ताचे नमुने बदलविण्यात आले, आता त्याच पद्धतीने राजकीय दबावाखाली कारखाली मारले गेलेले तरुण-तरुणी हे नशेत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मृतकांचा व्हिसेरा रिपोर्ट बदलविण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
पुणे अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी तो दारू पिऊन असतानाही त्यांच्या रक्ताचे नमुने बदलविण्याचा प्रयत्न झाला होता हे आता जगजाहीर झाले आहे. यासाठी कशा पद्धतीने राजकीय दबावाचा वापर करण्यात आला हेसुद्धा समोर आले आहे. त्याच पद्धतीने आरोपीला वाचविण्यासाठी ज्यांचा अपघात झाला तेच दारू पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असे दाखविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपीच्या निर्दोष सुटकेसाठी खटाटोप
मृतकांचा शवविच्छेदनाच्या वेळी जो व्हिसेरा काढण्यात आला त्यात थोडा दारूचा अंश टाकून व्हिसेरा रिर्पोट हा Alcohol Positive आणायचा. यामुळे न्यायालयात असे समोर येईल की, मृतक हे दारू पिऊन होते आणि कार चालविणारा हा दारू प्यायला नव्हता. विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाच्या निर्दोष सुटकेसाठी अशा पद्धतीने खटाटोप सुरू असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.