सध्या ब्रेक घेतोय… अभिषेक बॅनर्जींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने चांगली कामगिरी करत एकूण 42 जागांपैकी 29 जागा जिंकल्या. पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही डायमंड हार्बर मतदारसंघात 7.10 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. मात्र विजयाच्या अवघ्या आठवड्यानंतर त्यांनी सोशल मीडिया एक्सवर असे काही लिहिले ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी बुधवारी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ‘मला प्रचंड मताने विजयी केल्याबाबत जनतेनचे मनापासून आभार. मी काही वेळासाठी विश्रांती घेत आहेत’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या विश्रांतीच्या बातमीने देशभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला आणि जुलैमध्ये होणाऱ्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मागच्या वर्षी याच दरम्यान मला नबोजोवार यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मी तळागाळातील लोकांच्या समस्या आणि आव्हाने समजून घेण्यासाठी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये फिरलो. वाढत्या किमती आणि मनरेगाची थकबाकी भरणे ठप्प झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाला प्रत्यक्ष पाहिल्यावर मन हेलावले. प्रतिसादात @AITCofficial ने राज्यव्यापी निदर्शने आयोजित केली होती आणि लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी प्रकरण दिल्लीला नेले होते. फेब्रुवारीमध्ये याची दखल घेण्यात आली आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी लक्ष्मी भंडार योजनेद्वारे आर्थिक मदत वाढवण्यात आली. यासोबतच बंगालच्या लोकांचा आमच्यावर असलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लोकांचा राग आणि निराशा प्रतिबिंबित करतात. 31 डिसेंबरपर्यंत याचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि मी आधीच HCM आणि GoWB च्या संबंधित अधिकाऱ्यांना या समस्येला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिले आहे.

काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे मी छोटा ब्रेक घेत आहे. ही सुट्टी माझ्यासाठी आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या गरजा जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी असेल. मला विश्वास आहे की GoWB त्वरेने काम करेल आणि गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे ते म्हणाले. याआधी अभिषेक बॅनर्जी 2023 मध्ये डोळ्यांच्या उपचारासाठी परदेशात गेले होते. मात्र, अशाप्रकारे ब्रेक घेण्याची घोषणा त्यांनी पहिल्यांदाच केली. अचानक झालेल्या या राजकीय घोषणेची बंगालच्या राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या पक्षाची चर्चा आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि त्यांचे राजकीय वारस अभिषेक यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद आहेत, असा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे.