नागरी उड्डयान मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी गुरुवारी विमान तिकिटांच्या दरात सतत वाढ होत असल्याची कबुली दिली. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी एक प्रवासी म्हणून त्यांचा वैयक्तिक अनुभव शेअर केला, त्यावेळी हे विधान केलं. त्याबरोबरच सरकार या समस्येचं निराकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
नायडू यांनी 13 जून रोजी नागरी उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की सामान्य माणसासाठी हवाई प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक बनविण्यावर आपलं प्राथमिक लक्ष असेल असं ते म्हणाले.
‘कोविडच्या काळापासून, विमानाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. एक प्रवासी या नात्यानं मी या भाडेवाढ अनुभवली आहे. आम्ही भाडेवाढीचा आढावा घेणार आहोत’, असं राम मोहन नायडू यांनी सांगितलं. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
विमान भाड्यात झालेली वाढ ही देशभरातील प्रवाशांसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या काही महिन्यांत, तिकिटांच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाली आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांसाठी उड्डाण सुलभतेवर परिणाम झाला आहे.
शिवाय, देशाचे विमान वाहतूक क्षेत्र जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांशी झुंजत आहे, ज्यामुळे विमान वितरणास विलंब झाला आहे आणि भाडे वाढले आहे. 2023 मध्ये देशांतर्गत हवाई वाहतूक 23 टक्क्यांनी वाढली आहे आणि 153 दशलक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे, विश्लेषकांनी 2030 पर्यंत ही संख्या 300 दशलक्षांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
‘आमचा अजेंडा स्पष्ट आहे, आम्ही विमान प्रवास अधिक सुलभ बनवण्यावर भर देऊ’, असं नायडू म्हणाले. ‘प्रवासी हेच आमच्या कामाच्या केंद्रस्थानी असतील’, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, राम मोहन नायडू म्हणाले की त्यांची 100 दिवसांची कृती आराखडा तयार करण्याची योजना आहे. देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असलेल्या ‘विकसित भारत’ योजनेशी जुळणारी दीर्घकालीन दृष्टी या क्षेत्राला मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
‘आम्ही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी 100 दिवसांची योजना निश्चित करत आहोत आणि तिथून आम्ही दीर्घकालीन दृष्टीकडे – पुढील 100 वर्षांच्या स्वातंत्र्याच्या ‘विकास भारत’ योजनेकडे संक्रमण करू’, असं ते म्हणाले.
‘आम्हाला विमान भाडे परवडणारे बनवायचे आहे, एअरवेजला देशाची नवीन रेल्वे बनवायची आहे. सामान्य माणसाला तिकिटांच्या वाढीव किमतींबद्दल थोडी काळजी वाटते. आम्हाला अजूनही अधिक लोकांना विमान प्रवास घडवायचा आहे’, असंही त्यांनी सांगितलं.