काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केरळ दौऱयादरम्यान मलप्पुरम येथे घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. वायनाडची जागा सोडू की रायबरेलीची हे माझ्यासाठी मोठे धर्मसंकट आहे. मोदींप्रमाणे मला देवाचे मार्गदर्शन मिळत नाही. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे याचे उत्तर मला स्वतःलाच शोधावे लागेल. माझ्यासाठी देशातील गरीब जनताच देव आहे. त्यामुळे मी लोकांशी बोलेन आणि निर्णय घेईन, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींना जोरदार टोला लगावला.
केरळ आणि उत्तर प्रदेशातील लोकांनी मोदींना सांगितले की, संविधान आमचा आवाज आहे, त्याला कुणीही हात लावू शकत नाही. मोदी हुकूमशहाप्रमाणे वागू शकत नाहीत. निवडणुकीपूर्वी भाजपा नेते संविधान फाडण्याच्या गोष्टी करत होते. आता निवडणुकीनंतर मोदी संविधान डोक्यावर ठेवतात, असे राहुल गांधी म्हणाले.
प्रत्येक राज्याची संस्कृती संविधानामुळे सुरक्षित
देशात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषा आहेत. प्रत्येक राज्याची संस्कृती संविधानामुळे सुरक्षित आहे. जर संविधानच गेले तर उद्या जो केरळमध्ये येईल तो बोलेल की तुम्ही मल्याळम आहात. ही निवडणूक संविधानासाठी होती. एका बाजूला लोक म्हणतात आम्ही आमच्या संस्कृतीवर विश्वास ठेवतो. आमच्या भविष्याबद्दल आम्ही स्वतः निर्णय घेऊ, तर दुसरीकडे मोदी आणि शहा यांची इच्छा आहे की केरळच्या लोकांनी हिंदी बोलावे, असे सांगताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.