वरळी बीडीडी पुनर्विकासावेळी सरकारच्या वतीने विविध आश्वासने रहिवाशांना देण्यात आली. यात वर्षभराचे भाडे एकरकमी देण्याचे आणि पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर लॉटरी पद्धतीने सोडत काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या या दोन्ही आश्वासनांबाबत रहिवाशांमध्ये गैरसमज पसरले असून रहिवाशांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत खुलासा करून गैरसमज दूर करावेत आणि रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्य सरकारच्या वतीने 2021 साली बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प मंजूर केला. रहिवाशांनी सरकारवर विश्वास ठेवून घरे सोडली. पुनर्विकासातील इमारती बांधून पूर्ण झाल्यावर त्यांची लॉटरी पद्धतीने सोडत काढून रहिवाशांना देण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. त्याचबरोबर 11 महिन्यांचे एकत्रित भाडे रहिवाशांना देण्याचे ठरले होते, मात्र आता केवळ एक महिन्याचे भाडे देण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. यामुळे रहिवाशांमध्ये गैरसमज निर्माण झाले असून त्यांची चिंता वाढली आहे याबाबत सरकारने खुलासा करून गैरसमज दूर करावेत, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.