जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे या वर्षी होणाऱया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार आहेत. परंतु निवडणुकीआधी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याला सात दिवसांच्या खटल्यानंतर डेलावेअर न्यायालयाने गन प्रकरणात दोषी ठरवले आहे. अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंटरवर बंदूक परवान्यासाठी अर्ज करताना त्याच्या अमली पदार्थांच्या व्यसनाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. हंटरला दोषी ठरविल्यानंतर 120 दिवसांच्या आत शिक्षा जाहीर केली जाऊ शकते. हंटरला 25 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

हंटरवर आरोप काय?

ऑक्टोबर 2018 मध्ये हंटर बायडेनवर कोल्ट कोब्रा हँडगन खरेदी करताना खरी माहिती लपवल्याचा आरोप आहे. त्या वेळी त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते आणि तो नियमितपणे अमली पदार्थांचे सेवन करत होता. बंदूक खरेदी करण्यासाठी त्याने कागदपत्रात चुकीची माहिती दिली होती. खरे तर अमेरिकन कायद्यानुसार, ड्रग्ज सेवन करणाऱया व्यक्तीकडे बंदूक किंवा कोणतेही घातक शस्त्र असू शकत नाही.