नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात कोपरगावमधील ‘कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. त्यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना घेरण्यासाठी यांच्या शैक्षणिक व सहकारी संस्थांवर छापेमारी करून दबावतंत्राचा प्रयत्न झाला. परंतु अखेरच्या दिवसापर्यंत विवेक कोल्हे यांनी माघार न घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा डाव फेल झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे
गेल्या दोन-तीन दिवसात अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्याविरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत. विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून छापे टाकले गेले. त्यामुळे नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान कोल्हे यांच्या शैक्षणिक संस्थावरील ही छापेमारी चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रातील भाजप सरकारने विरोधकांना ‘नामोहरण’ करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप होत आहे. केंद्र सरकारने विरोधकांबाबत केलेल्या प्रकाराचा कित्ता राज्य सरकारने विवेक कोल्हे यांच्याबाबत गिरवल्याची चर्चा आहे.
मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले किशोर दराडे यांना यावेळेस शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवलेली आहे. युवा नेते विवेक कोल्हे हे भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. कोल्हे परिवाराचा सहकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विस्तार आहे. कोल्हे आणि विखे परिवारांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यात विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संदीप गुळवे यांना बळ दिले आहे. असे असले तरी सत्ताधारी आमदार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा धसका घेतला आहे. यातून कोल्हे-दराडे संघर्ष निर्माण झाला आहे.
नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याचा आजचा बुधवारी (12 जून) हा शेवटचा दिवस होता. याचदरम्यान विवेक कोल्हे यांच्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून छापे घातले घेतले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संभाजीनगर, पुणे, सोलापूर येथील पथकाने हे छापे घातले. तीन जूनपासून आतापर्यंत तीन वेळा पथकाने हे छापे घातले. मात्र पथकावा छाप्यांमध्ये अजूनतरी काही सापडले नसल्याची माहिती समोर येत आहे.
विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या संस्थांवर ही छापे म्हणजे, सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे कोल्हे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. आमदार किशोर दराडे यांना कोल्हे यांनी आव्हान निर्माण केल्याने सत्ताधाऱ्यांकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले गेले. आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या शिक्षकाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावरून नाशिक आयुक्तालयामध्ये हमरा-तुमरी झाली होती. नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीला धक्काबुक्की झाली होती. त्यावेळी विवेक कोल्हे यांनी आमदार दराडे यांच्यासह तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सुनावले होते.
पुढे नामसाधर्म्य असलेली ही व्यक्त बेपत्ता झाली. काल आयुक्तालयात येऊन स्वखुशीने अर्ज मागे घेत असल्याचे सांगून निघून गेली. मात्र आमदार किशोर दराडे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे यांना घेरण्यासाठी व त्यांनी माघारी घ्यावी यासाठी दबाव तंत्र म्हणून विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पथकाने छाप्यात काय आढळले हे अजून स्पष्ट केलेले नाही. परंतु विवेक कोल्हे यांनी उमेदवारी माघार घेतली नसल्यामुळे सर्व दबाव तंत्र फेल गेले असल्याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे