मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज धाराशिवचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार राजेनिंबाळकर यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण न्याय्य हक्कासाठी असल्याचे सांगितले. मात्र प्रकृतीही महत्त्वाची असून त्यांनी पाणी घ्यावे अशी विनंती आपण त्यांना केल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घेऊन पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांना यावेळी महिला आंदोलकांनी अडवले. मराठा समाजासाठी काय भूमिका घेणार असा महिलांनी सवाल करुन, “मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी संसदेत फक्त विषय मांडू नका संसद बंद पाडा”, अशी मागणी महिलांनी केली. सरकारने मार्ग काढण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही मागे लागू, असे आश्वासन यावेळी राजेनिंबाळकर यांनी महिलांना दिले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे परभणी येथील शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जाहीर केले. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या आणि राज्य सरकारला सूचना देण्यासंदर्भात खासदार जाधव यांनी राज्यपालांनाही पत्र लिहिले आहे.